चिपळूण (प्रतिनिधी) : आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या उपस्थितीत चिपळुणात दि. ३ सप्टेंबर रोजी कोकण प्रदेश कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून गाव भेटीचा कार्यक्रम जोरदारपणे सुरू आहे.
गावागावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती पक्षाचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते व सरचिटणीस उमेश सकपाळ यांनी दिली. चिपळूण तालुक्यात आरपीआय पक्षाची मोठी ताकद आहे. अलिकडच्या काळात मात्र कोणते मोठे कार्यक्रम राबविण्यात न आल्याने पक्षांतर्गत थोडी मरगळ आली होती. ती मरगळ झटकून पुन्हा एकदा नव्याने उभारी घेण्यासाठी, संघटन बांधणीत तरूणांना सहभागी करून घेण्यासाठी आणि पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी या कोकण प्रदेश कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळाव्याला तुफान गर्दी व्हावी यासाठी चिपळूण तालुक्याचे अध्यक्ष प्रशांत मोहिते, कार्याध्यक्ष संदेश कदम, सरचिटणीस उमेश सकपाळ, सहचिटणीस भुपेन्द्र पवार, शहर अध्यक्ष मंगेश जाधव, शहर सरचिटणीस अमोल कदम, जिल्हा सहचिटणीस विद्याधर गमरे, सुधीर गमरे, अशोक पवार, सुरेश मोहिते, अतुल कदम, श्रीपत पवार, प्रशितोष कदम, प्रणीत पवार आदी पदाधिकारी, कार्यकर्ते गावागावात जाऊन आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. तालुक्यातून त्यांच्या या दौऱ्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पक्षाचे अध्यक्ष ना. रामदास आठवले या मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला असून त्यांचे चिपळूण तालुक्यात जंगी स्वागत केले जाणार असल्याचेही प्रशांत मोहिते यांनी सांगितले.












