ग्रामीण रुग्णालय लांजाचा सेफ्टी टॅंक ओवरफ्लो
सांडपाणी वाहू लागले थेट तालुका आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्यालयासमोरून
सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण
जिल्हा प्रशासनाकडे मागणी करूनही कोणत्या प्रकारची कार्यवाही नाही
लांजा | प्रतिनिधी : शहरातील ग्रामीण रुग्णालय लांजाचा सेफ्टी टॅंक ओव्हरफ्लो झाल्याने त्यामधील सांडपाणी ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात वाहत असून ते थेट तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या बाजूने वाहत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. याचा त्रास आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच आजूबाजूच्या परिसरातील लोकांना होत आहे.दरम्यान या सेफ्टी टॅंक ओव्हरफ्लो झाल्याबाबतची तक्रार तालुका आरोग्य अधिकारी यांनी जिल्हा शासकीय प्रशासनाकडे करूनही या समस्येकडे दोन महिन्याचा कालावधी उलटला तरी दुर्लक्ष करण्यात आल्याने आरोग्य विभागालाच स्वच्छतेचे वावडे आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
लांजा ग्रामीण रुग्णालयाच्या सेफ्टी टॅंक हा ओव्हरफ्लो होऊन त्यातील सांडपाणी हे गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात वाहत आहे. यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधीचे वातावरण पसरले असून याचा त्रास आरोग्य कर्मचाऱ्यांनाही सहन करावा लागत आहे .याच परिसरात आजूबाजूला अन्य खाजगी दवाखाने, पंचायत समिती कार्यालय आहे. अशा प्रकारे या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे परिसरात घाणीचे आणि दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले असून डासांचा उपद्रव देखील वाढला आहे .हे सांडपाणी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालया जवळूनच वाहत आहे .त्यामुळे त्याचा त्रास आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही होत आहे.याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांनी जिल्हा प्रशासनाकडे याबाबत तातडीने कार्यवाही करावी आणि ही समस्या मार्गी लावावी अशी मागणी केली आहे .मात्र त्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून अद्यापही कोणत्या प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा प्रश्न अद्यापही जैसे थे आहे. त्यामुळे स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या आरोग्य विभागालाच स्वच्छतेचे वावडे आहे का? असा प्रश्न आता शहरातील नागरिकांतून केला जात आहे.