अनधिकृत वाळू उत्खनन साहित्यासह होड्या जाळल्या ; महसूल पथकाची बांदिवडे सय्यद जुवा खाडी पात्रालगत कारवाई

मालवण प्रतिनिधी : अनधिकृत वाळू उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई सलग दुसऱ्या दिवशी करण्यात आली. शनिवारी पहाटे बांदिवडे सय्यद जुवा खाडी पात्रालगत चार बोटी वाळू उत्खनन करण्याच्या उद्देशाने होड्या उभ्या असलेल्या दिसून आल्या. तसेच परप्रांतीय कामगारही परिसरात असल्याच्या दिसून आले. महसूल विभागाच्या पथकाची माहिती मिळतात परप्रांतीय कामगार होड्या तिथेच टाकून पळून गेले. दरम्यान महसूलच्या पथकाने वाळू उत्खनन करण्यासाठी असलेल्या साहित्याची आणि होड्यांची जाळून विल्हेवाट लावली.

मालवण तालुक्यात कारवाई मोहीम तीव्रपणे राबवली असून सर्वत्र गस्तीपथके तैनात केलेली आहेत. यात महसूल विभागाचे अधिकारी, पोलीस, बंदर विभाग यांचाही समावेश करण्यात आलेला आहे.

या कारवाई मोहिमेत नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, मंडळ अधिकारी सुहास चव्हाण, तलाठी राठोड, शेजवळ, जाधव, राजुरकर, लाखमोड यांनी सहभाग घेतला. सकाळी परप्रांतीय कामगारांच्या झोपड्या तसेच इतर साहित्य महसूल विभागाने जप्त करत पोलीस पाटलांच्या ताब्यात दिले होते. बेकायदेशीर वाळू उत्खननाने वाहतूक रोखण्यासाठी यापुढे कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे महसूल विभागाणार स्पष्ट केले.

बेकायदेशीर वाळू उत्खनन व वाहतूक करणारे थांबत नसल्याचे संबंधितांवर शासकीय मालमत्तेची चोरी केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे. कामगारांना व्यवसाय करण्यासाठी आणून त्यांच्याकडून शासकीय मालमत्तेची चोरी केली जात असल्याने कामगारांबरोबरच त्यांना आणणाऱ्या मुख्य एजंटाला अगर मालकाला या कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले.