शेलारवाडी धरणग्रस्तांना पर्यायी शेत जमीन देण्यास विलंब!

 

जिल्हाधिकारी कार्यालयात मुदतीत रक्कम न भरल्याचे कारण

खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील शेलारवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पांतर्गत गणवालमधील धरणग्रस्तांनी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पर्यायी शेत जमीन मिळण्यासाठी जमिनीच्या मोबदल्याच्या ६५ टक्के रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात भरले. मात्र सदर रक्कम मोबदला मिळाल्यापासून ४५ दिवसांच्या मुदतीत भरले नसल्याचे कारण दाखवत शासनाकडून पर्यायी शेत जमीन देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.

शेलारवाडी लघु पाटबंधारे प्रकल्प खेडच्या बुडीत क्षेत्रातील मुदतीबाहेर ज्या १८ लोकांनी पैसे गणवाळमधील भू-संपादनाचा मोबदला वाटप करतेवेळी प्रकल्पग्रस्तांना कलम १६ (१) नुसार पर्यायी शेतजमीन हवी आहे का, या बाबत लेखी नोटीस काढण्यात आली. नव्हती. त्यामुळे भू-संपादनाच्या मोबदला वाटपानंतर ४५ दिवसांच्या आत मोबदला रकमेच्या ६५ टक्के रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावी, अशी कोणतीही माहिती मिळाली नव्हती. गणवालमधील १५ प्रकल्पग्रस्तांनी पर्यायी शेतजमिनीसाठी मुदतीत पैसे भरले. मात्र १८ प्रकल्पग्रस्तांनी मुदतीबाहेर पैसे भरले. त्यांना शासनाने पर्यायी जमीन द्यावी अथवा पॅकेज द्यावे, याबाबत प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी जयराम आंब्रे हे जिल्हाधिकारी कार्यालय व शासन स्तरावर पाठपुरावा करत आहेत.

मात्र या बाबत जिल्हाधिकारी कार्यालय व शासन स्तरावर मुदती बाहेर पैसे भरलेल्या प्रकल्पग्रस्तांना पर्यायी शेतजमिनी देण्याबाबत निर्णय झालेला नाही. यासाठी आंब्रे यांनी उपोषणाचा मार्गही अवलंबला. परंतु शासनस्तरावर प्रस्ताव पाठवण्यात आला असून याबाबत पाठपुरावा चालू आहे, असे उत्तर जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळत आहे.