सावंतवाडी । प्रतिनिधी : स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाची संपूर्ण योजना व तयारी शाळेतील विद्यार्थ्यांनी केली. विद्यार्थ्यांच्या स्वबुद्धिमत्तेच्या योजनेमुळे या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची सृजनशीलता प्रकाशित झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर, मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत व सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांचे गुलाब पुष्प देऊन व गीत सादर करून स्वागत केले. इयत्ता १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांबद्दल आपली मते मांडून त्यांच्याबद्दल आपल्या मनातील आदरभाव व्यक्त केले.
त्याचप्रमाणे ५ वी च्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी करमणुकीसाठी नृत्य सादर केले. तसेच, विविध चिठ्ठयांच्या माध्यमाने शिक्षकांसाठी खेळ आयोजित केले. कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले व आपल्या जीवनात गुरूंची शिकवण किती महत्वाची आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर, मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत , शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील सर्व विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेचे कौतुक केले. व त्यांना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अशाप्रकारे, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये साजरा झालेला शिक्षकदिन हा विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देणारा व सर्व विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांविषयी आदरभाव निर्माण करणारा असा ठरला.












