शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्राथमिक शिक्षक समितीचे शिक्षक दिनी सामूहिक रजा आंदोलन

लांजा तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

संतोष कोत्रे | लांजा : अभ्यासक्रमा व्यतिरिक्त राबविण्यात येणारे अनेक अशैक्षणिक उपक्रम व कामातून प्राथमिक शिक्षकांना पूर्णपणे मुक्त करा या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी सामूहिक रजा आंदोलन पुकारण्यात आले. याबाबत लांजा तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर सादर करण्यात आले. अभ्यासक्रमा व्यतिरिक्त राबविण्यात येणारे अनेक अशैक्षणिक उपक्रम, नवभारत कार्यक्रमांतर्गत निरक्षर सर्व्हेक्षण, विविध ॲपवर भरावी लागणारी ऑनलाईन माहिती, शिक्षण विभागा व्यतिरिक्त इतर विभागांच्या मोहिमांची जनजागृती अशा अशैक्षणिक कामातून प्राथमिक शिक्षकांना पूर्णपणे मुक्त करा, फक्त विद्यार्थ्यांना शिकवू द्या , अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक दिनी सामूहिक रजा आंदोलन केले.

शासन एकीकडे शिक्षकांना सातत्याने अशैक्षणिक कामांसाठी जुंपवत आहे. शिक्षकांना शाळाबाह्य करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याचा धडाका सुरु आहे. दुसरीकडे शिक्षकांची अनेक रिक्त पदे भरण्याची तसेच केंद्रीय प्रमुख, विस्तार अधिकारी पदोन्नतीची कार्यवाही करण्यात दिरंगाई होत आहे. सर्वांना जुनी पेन्शन लागू करणे, सर्व शिक्षकांना निवडश्रेणीचे लाभ देणे, सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकी जमा करणे यासह विविध मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत.

निवेदन सादर करतांना तालुकाध्यक्ष उमेश केसरकर, दिलीप दिवाळे, चंद्रकांत कांबळे, विजय कदम, पर्शुराम मासये, दिनेश झोरे, सुदेश आयरे, मधुकर चौगुले, संतोष पालकर, पांडुरंग जोशी, विजयकुमार गावडे, विठोबा कोकरे, रघुनाथ धावडे, नंदकुमार गोतावडे, दत्ताराम गोरे, शांताराम आग्रे, कमलाकर पडवळ, जयप्रकाश चावरे, प्रमोद कांबळे आदी संघटना पदाधिकारी उपस्थित होते.