रत्नागिरी | प्रतिनिधी : समोरुन येणार्या वाहनाने हुलकावणी दिल्याने रत्नागिरी येथून वसईला जाणारी एसटी बस रस्त्याच्या बाजूला कलंडल्याने अपघात झाला. सोमवारी सकाळच्या सुमारास मुंबई – गोवा महामार्गावर हातखंबा येथे हा अपघात झाला. या अपघातात बसमधील चार प्रवासी जखमी झाले आहेत.
रत्नागिरी-महाड-वसई (एमएच 14, बीटी 2498) ही गाडी सोमवारी सकाळी रत्नागिरीहून महाडकडे जाण्यासाठी निघाली होती. या गाडीमधून 21 प्रवासी प्रवास करत होते. गाडी महामार्गावरील हातखंबा येथे आली असता समोरुन येणार्या वाहनाने बसला हुलकावणी दिली. त्यामुळे चालकाने बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता गाडी रस्त्याच्या बाजूला असणार्या चरात कलंडली. या चरातच गाडी अडकून राहिल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र, या अपघातात अंजली एकनाथ पडवळ (48,रा, रत्नागिरी), रवींद्र शिवाजी खानविलकर (55), रतिशा शिवाजी खानविलकर (50, दोन्ही रा. रेल्वे स्टेशन सोसायटी, रत्नागिरी) आणि रमा लक्ष्मीकांत भाटकर (46,रा. सन्मित्रनगर रत्नागिरी) हे प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
पालकमंत्री सामंत यांचा ताफा थांबवून जखमींना मदत राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत सोमवारी आपल्या कारने पाली येथून मुंबईच्या दिशेने जात होते. हातखंबा येथे त्यांच्या समोरच अपघात झाल्यानंतर तातडीने त्यांनी आपला ताफा थांबवून जखमींना एसटीमधून बाहेर काढले आणि आपल्या सुरक्षा रक्षकांच्या गाड्यांमधून रुग्णालयात पाठवून दिले. त्यांनी दाखवलेल्या समयोचिततेबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.










