बामणोली येथील लोककलावंत शाहीर सोनू कुळे यांचे निधन

चिपळूण (वार्ताहर) : बामणोली गावचे गावकर आणि दैनिक प्रहारचे पत्रकार संतोष कुळे यांचे ज्येष्ठ बंधू स्व. सोनू रत्नू कुळे यांचे रविवारी 24 रोजी संध्याकाळी सात वाजता दुःखद निधन झाले त्यांच्या अचानक जाण्याने कुळे परिवार दुःखाच्या छायेत आहे.

एक ज्ञानी तुरेवाले शाहीर म्हणून त्यांची ख्याती होती. सुंदर हस्ताक्षर आणि जुन्या कविता, श्लोक, आरत्या, गीते ही त्यांची आजही तोंड पाठ होती. एक लोकशाहीर हरपल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली. सांस्कृतिक कलेचा वारसा त्यांनी जपला होता. यावर्षीच्या गणपती सणात ते आरती आणि श्लोक म्हणण्यासाठी पुढे होते. मात्र, गणपती विसर्जना नंतर ते दुसऱ्या दिवशी असा निरोप घेतील असे कुणालाही वाटले नव्हते. मनमिळावू स्वभाव आणि कष्टकरी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे बारावे कार्य दि. ५ ऑक्टोबर रोजी बामणोली येथे त्यांच्या निवासस्थानी होईल. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, भाऊ आणि नातवंडे असा परिवार आहे.