रत्नागिरीत स्वागत समारंभ
रत्नागिरी : शहरातील जैन समाजातील प्रीत मनसुख जैन हा फक्त १४ वर्षांचा युवक गुरुंकडून दीक्षा घेणार आहे. हा कार्यक्रम हुबळी येथे होणार असून उद्या रविवारी रत्नागिरीमध्ये त्याच्या स्वागताचा भव्यदिव्य कार्यक्रम जैन मंदिरामध्ये आयोजित केला आहे. प. पू. आचार्य भगवंत श्री अजितशेखर सूरीश्वरजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली तो दीक्षा घेणार आहे.
एवढ्या लहान वयात दीक्षा घेण्याची प्रेरणा प्रीतला कोणाकडून मिळाली याची माहिती घेतली असता पू. साध्वी जी श्री. दर्शनप्रभाश्रीजी म.सा., पू. मुनिराज श्री जैनतीर्थशेखर विजयजी म.सा.. (सांसारिक नावं सिद्धार्थ भरतजी जैन, जे.लालचंद सराफ) आणि पू. मुनिरज श्री योगदृष्टीशेखर म.सा. (सांसारिक नावं भरत भाई लालचंदजी जैन, जे.लालचंद सराफ) यांच्याकडून मिळाली आहे. तसेच प्रीतला त्याची आत्या पू. साध्वी जी श्री सकलतीर्थप्रभाश्रीजी म. सा. आणि बहीण पू. साध्वी श्री. परमतिर्थप्रभाश्रीजी म.सा. यांच्याकडूनही प्रेरणा मिळाली आहे.
रत्नागिरीमध्ये याच आचार्य भगवंताच्या मार्गदर्शनाखाली ८ दीक्षा झाल्या आहेत. चार वर्षांपूर्वी रत्नागिरीमध्ये झाल्या होत्या. हा ऐतिहासिक समारंभ प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे झाला होता. २०१२ साली आचार्य अजितशेखर सूरीश्वर भगवंतांनी भाकीत केला होते की या रत्ननगरीमधून कमीत कमी १० दीक्षा होतील आणि ते भाकीत आज खरे ठरत आहे. प्रीतची दीक्षा ही रत्नागिरीतील १० वी दीक्षा आहे.
प्रीतच्या स्वागत व पुढील आयुष्यासाठी जैन समाजाने गेल्या तीन दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यातील मुख्य कार्यक्रम उद्या रविवारी होणार आहे. दीक्षा कार्यक्रमासाठी जैन समाजामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.