लांजा तालुका काँग्रेस पक्षात उभी फूट, एक गट वेगळी चुल मांडणार

वरिष्ठ पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून दखल घेतली जात नसल्याने जुने जाणते आणि निष्ठावान नाराज

संतोष कोत्रे | लांजा : तालुकाध्यक्ष आणि कार्यकारणीत झालेले अनपेक्षित फेरबदल, निष्ठावान आणि जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांची होणारी सततची गळचेपी आणि या संपूर्ण प्रकरणाकडे पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून होणारे दुर्लक्ष यामुळे लांजा तालुका काँग्रेस पक्षात उभी फूट पडली असून पक्षाच्या निष्ठावान व जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांचा एक गट पक्षाला रामराम ठोकून वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहे.

लांजा तालुका काँग्रेस पक्ष हा अंतर्गत कुरबुरीने व्यापला आहे. त्यामुळे निष्ठावान आणि जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे .लोकशाही मार्गाने चालणाऱ्या काँग्रेस पक्षात सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन , त्यांची मते ऐकूण त्यावर निर्णय घेतले जातात .मात्र लांजा तालुक्याच्या बाबतीत याबाबत वेगळे चित्र असल्याचे या नाराज कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. लांजा तालुका कार्यकारिणी ची साधी मीटिंग झालेली नाही. जुन्याजाणत्या निष्ठावान कार्यकर्त्यांना कधीही या मीटिंग बाबत विश्वासात घेतले जात नाही. आगामी जिल्हा परिषद ,पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आलेले आहेत. लोकांचे अनेक प्रश्न आहेत. मात्र त्यावर कधीही आंदोलन झाले नाही किंवा तालुका कार्यकारणीत तशी चर्चा देखील झाली नसल्याचे या नाराज कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

तालुकाध्यक्ष पद निवडीच्या वेळी अशाच प्रकारे कोणालाही विश्वासात न घेता तत्कालीन जिल्हाध्यक्ष यांनी परस्पर मोबाईलच्या व्हाट्सअप वर पत्र टाकून लांजा तालुका अध्यक्ष बदलला होता. त्याची तक्रार प्रदेश कार्यालयाकडे करण्यात आली होती .मात्र त्याबाबत कोणताही विचार झालेला नाही. लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते असलेल्या राजेश राणे यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. परंतु जिल्हा स्तरावरील आणि तालुका स्तरावरील काही पक्षाच्या माणसांनीच राजेश राणे यांना पाडण्याचे काम केल्याचा आरोप देखील या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आणि त्यामुळेच या निवडणुकीत राजेश राणे यांचा 250 ते 300 मतांनी पराभव झाला होता. कार्यकारणीतील या सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे आणि विश्वासात न घेण्याच्या भूमिकेबाबत प्रदेश स्तरावर सातत्याने पत्रव्यवहार आणि तक्रारी करून देखील तिकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नसल्याने हे सर्व निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. तालुका काँग्रेसची अशा प्रकारे दिवसेंदिवस बिकट अवस्था होत असताना जिल्हास्तरावरून याबाबत साधी चर्चा देखील केली जात नाही .किंवा या बाबत काही कार्यवाही होतात दिसून येत नाही. आणि त्यामुळेच त्या सर्व गोष्टींना काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील निष्ठावान काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते हे कंटाळलेले असून प्रदेश काँग्रेस कडून आमच्या तक्रारीची दखल घेतली जात नसेल आणि जिल्हास्तरावरील ज्या लोकांनी पक्षाच्या विरोधात काम केले आहे त्यांना अभय दिले जात असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही, अशी भावना जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणूनच या साऱ्या गोष्टीला कंटाळून काँग्रेसमधील निष्ठावान कार्यकर्त्यांचा एक गट वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहे. तशा या गटाची चर्चा देखील झालेली आहे.

नवीन कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देण्यास कार्य हरकत नाही, मात्र त्याचवेळी जुन्या कार्यकर्त्यांना देखील विश्वासात घेतले पाहिजे होते .परंतु तसे होताना दिसत नाही. हुकूमशाही पद्धतीने अंतर्गत काँग्रेसची वाटचाल होत असल्याचे दिसत आहे असे मत या निष्ठावान कार्यकर्त्यांचे आहे. आणि म्हणूनच संपूर्ण या प्रकरणाची प्रदेश कार्यालयाने, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेतली नाही तर त्याचे परिणाम हे आगामी निवडणुकीत पक्षाला भोगावे लागतील असं देखील त्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.