केळशी पंचक्रोशीत पुन्हा बिबट्यांचा वावर

दापोली| प्रतिनिधी : तालुक्यातील केळशी पंचक्रोशीतील उटंबरमध्ये पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने पंचक्रोशित भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आंजर्ले येथे काहीच दिवसापूर्वी डाॅ.दांडेकर यांच्या घराच्या पडवीतून कुत्र्याला बिबट्याने पळवले होते.ही आठवण ताजी असतानाच आता केळशी भागात बिबट्याचा वावर सुरू झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. केळशी पंचक्रोशीत येणाऱ्या उंबरशेत, रोवले. आतगाव आंबवली आणि उबर या परिसरात बिबट्याचे दर्शन होत असते. या वस्त्यांच्या आजूबाजूला जंगल असल्याने त्याचे वावर अगदी सहज असतो. या गावातील हद्दीत केळशीतील शेतकऱ्यांची शेतजमिनी असल्याने त्यांचे येणे जाणे सुरू असते. त्यामुळे या परिसरातील लोकांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी संध्याकाळी उटबर चिंचवळ वाडीत सुहास भोगल यांच्या घराजवळ त्यांना अगदी वीस फुटाच्या अंतरावर अचानक बिबट्या दिसल्याने ते काही क्षण घाबरून गेले. त्यामुळे याचा बंदोबस्त वनखात्याने करावा अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थ करत आहेत.