बहाद्दूर शेख नाका येथील उड्डाण पुलाचे गर्डर तुटल्याने संबंधित अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कारवाई करा

देवा ग्रुप संघटना भारत यांनी दिले तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना दिले निवेदन

चिपळूण (वार्ताहर) : मुंबई गोवा महामार्गाच्या चिपळूण बहाद्दूर शेख नाका येथील उड्डाण पुलाचे गर्डर तुटल्याने संबंधित अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याबाबत देवा ग्रुप संघटना भारत संघटनेचे चिपळूण सावर्डे विभागाचे अध्यक्ष साहिल मंगेश घाग आणि पदाधिकारी यांनी चिपळूण तहसिलदार आणि पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, गेली १७ वर्ष चालू असलेले मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम आश्वासने देऊन देखील काही पूर्ण करण्यात आले नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेंच केंद्रीय बांधकाम मंत्री व सरकारचे हे अपयश मानावे लागेल. कित्येक वर्ष चालू असलेल्या महामार्गाच्या कामामुळे अनेक ठिकाणी अपघात हे होत आहेत . विविध समस्यांना स्थानिक नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यावर कोकणात ठिकठिकाणी विविध प्रकारची आंदोलने, मोर्चे काढून देखील सरकारकडून काही ठोस पाऊले अजून काही उचलली गेली नाहीत.

पावसाळ्यापूर्वी चौपदरीकारणातील किमान एकेरी वाहतूक सुरु करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रयत्न केले. मात्र याकामी तितकेसे यश काही आले नाही. विशेषतः शहरातील बहादूरशेख नाक्यातील उड्डाणं पुलाच्या कामाला चांगलीच गती मिळाली होती. सुरुवातीला शहरातून जाणारा १.८५ किलोमीटर अंतर हा उड्डाणं पूल उभारताना अनेक अडचणींना सामना करावा लागला आहे. या पुलांतर्गत एकूण ४६ पिलर उभारल्यानंतर तात्काळ गर्डर चढविण्याचे काम सुरु होते.

उड्डाण पुलाचे काम वाशिष्ठी पुलाच्या बाजूने सुरु केले आहे. एकूण ४६ पिलर असताना त्यातील सहाव्या पिलर पर्यंतचे काम पूर्ण होत आले आहे. अशातच पाचव्या पिलरच्या ठिकाणी असलेले गर्डर खचले. त्यामुळे परिसरात जोरदार आवाज ही झाला. यावेळी नागरिकांची पळापळ झाली पुलालगात असलेल्या इमारतीतील व्यापारी व रहिवाशांची धावाधाव झाली. या पुलाच्या ठिकाणी काम करत असलेल्या कामगारांनीही तेथून पळ काढला.

सध्या पुलाचे काम थांबविण्यात आले असून अशा निष्कृष्ठ दर्जाचे काम, ठेकेदारांचा निष्काळजीपणा याला नक्की जबाबदार कोण ? कोसळलेल्या पुलाच्या प्रकरणाची सखल चौकशी करून संबंधितांवर सरकार कधी कारवाई करणार? ठिकठिकाणी होत असलेली जीवितहानी यावर स्थानिक नागरिकांनी आंदोलने मोर्चे काढून देखील सरकार ठोस पाऊले उचलण्यास असमर्थ आहे. सरकारचा यामागचा वेळकाढूपणा दिसून येत आहे. जीवितहानी, स्थानिक नागरिकांची गैरसोय अशा विविध समस्या सरकारच्या निदर्शनास आणून देखील सरकार निव्वळ वेळकाढूपणा करत आहे. असे निष्काळजी ठेकेदार, संबंधित अधिकारी यांच्यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा देवा ग्रुप संघटना रत्नागिरी जिल्हा व देवा ग्रुप संघटना चिपळूण तालूका येत्या काही दिवसात या विषयी आक्रमक पवित्रा घेईल. असे त्यांनी निवेदनात लिहिले आहे. निवेदन देते वेळी संघटनेचे विशाल हरावडे, अमेय उतेकर, निखिल मुंडेकर,पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.