शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन
नाट्योत्सवात राज्यभरातील विभागस्तरीय आठ संघ होणार सहभागी
सावंतवाडी । प्रतिनिधी : राज्य विज्ञान शिक्षण संस्था ही राज्यस्तरीय संस्था विज्ञान आणि गणितासाठी काम करते. विज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या संस्थेकडून विविध उपक्रम राबवले जातात. शिक्षकांसाठीही वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. याचपैकी ‘विज्ञान नाट्योत्सव ‘ हा एक वेगळा उपक्रम आहे. गतवर्षी जयगड येथे घेतलेल्या नाट्य महोत्सवानंतर सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाने आग्रह केल्यामुळे सावंतवाडीत या राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवीनगर नागपूरच्या संचालक डॉ. राधा अतकरी यांनी दिली.
दरम्यान, याच पाश्वभूमीवर शिक्षणाधिकारी जि. प. सिंधुदुर्ग आणि कळसूलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडीतील बॅ.नाथ पै सभागृहात शुक्रवार २७ ऑक्टोबर रोजी हा महोत्सव होणार असून त्याचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी दिली.
सावंतवाडी येथे शालेय शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवीनगर नागपूरच्या संचालक डॉ. राधा अतकरी यांच्यासह राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणेचे संचालक अमोल येडगे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर नागपूरचे विज्ञान पर्यवेक्षक राजू नेब, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण मानकर, जिल्हा विज्ञान मंडळाचे सचिव प्रकाश कानूरकर, कोषाध्यक्ष राजाराम फर्जंद, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय शेवाळे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, दीपक केसरकर मित्रमंडळाचे पदाधिकारी आबा केसरकर, प्रसन्न उर्फ नंदू शिरोडकर आदी उपस्थित होते.
या राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सवात राज्यातील विभाग स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या ८ विभागांचे ८ संघ सहभागी होणार आहेत. तर या प्रत्येक संघात ८ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या नाट्योत्सवासाठी ‘मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान ‘ हा मुख्य विषय असून श्री अन्न – मिलेट – श्रेष्ठ आहार, खाद्य सुरक्षा, दैनदिन जीवनात आधुनिक तंत्रज्ञान, आरोग्य सेवेतील सध्याची ( वर्तमान ) प्रगती व समाजातील अंधश्रद्धा व अंधविश्वास हे इतर विषय राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारची राज्यस्तरीय व भव्य अशी स्पर्धा होत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाच्या सहकार्यातून ही स्पर्धा होत असून यासाठी शिक्षण मंत्री दीपक केसरकर मित्र मंडळ सावंतवाडी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व हायस्कूलच्या किमान एक विज्ञान शिक्षक यावेळी उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील सहाशे विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेणार आहेत. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी हा या मागचा उद्देश असून शालांतर्गत स्पर्धा घेताना या नाट्यमहोत्सवातून मार्गदर्शन होणार आहे. त्यामुळे भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुले अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी निश्चितच मदत मिळेल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.