पारकंराचा ‘संदेश’ गोव्यात किती कार्यक्षमपणे काम करतो हे जिल्हावासियांना माहित

माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांचा पारकरांना भीम टोला

दोडामार्ग । प्रतिनिधी : आमदार नितेश राणे यांनी आपल्या विधानसभा मतदार संघात सत्तेत नसतानाही आणि आता सत्तेत असताना मोठया प्रमाणात विकास कामे केली आहेत. हे मतदार संघातील जनतेने अनुभवले आहे. एक कार्यक्षम आमदार म्हणून त्यांचा राज्यात नावलौकिक झाला आहे. त्यामुळे त्यांची काळजी करण्यापेक्षा पारकर तुम्ही शेजारील गोवा राज्यात कसे कार्यक्षमपणे सामाजिक काम करत आहात याची चर्चा कणकवली शहरात तुमच्याच लोकांकडून नाक्यावर केली जाते. याचे कधीतरी आत्मपरीक्षण करा, असा सल्ला जिल्हा परिषदेचे माजी
समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी दिला आहे.

कणकवली देवगड वैभववाडीचे आमदार नितेश राणे यांच्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी वैभववाडीत टीका केली त्याला माजी सभापती अंकुश जाधव यांनी प्रत्युत्तर दिले. आमदार नितेश राणे सामाजिक, विकासात्मक तसेच आरोग्य विषयक प्रश्न तळमळीने राज्य सरकारच्या माध्यमातून सोडवत आहेत. मतदार संघात सातत्यपूर्ण जनतेत जाऊन प्रश्न समजावून घेत ते स्वतः सोडवत आहेत. त्यांचा जनतेशी असलेला थेट संपर्क आणि संवाद त्यामुळे ते लोकप्रिय लोकप्रतिनिधी म्हणून राज्यात त्यांची प्रतिमा आहे. हे स्वार्थी राजकारण करणाऱ्या व ज्यांची ओळख जिल्ह्यात पोस्टर बॉय अशी आहे त्या संदेश परकरांना कळणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवारीवरून सतीश सावंत आणि पारकर यांच्यात असलेली छुपी स्पर्धा आणि शीत युद्ध सर्वाना माहित आहे.त्यातूनच पारकर असो किंवा सावंत हे आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करून मातोश्रीला खूष करण्याचा प्रयत्न करीत असतात. मुळात पारकर आणि मंडळी सतत तुम्ही सत्तेत होता किती लोक हिताचे प्रश्न सोडवलात. किती संसार उभे केलात हे जाहीर करा. उगाचच विरोधाला विरोध म्हणून जिल्ह्यात होत असलेल्या विकासाला अपशकून करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. तुम्ही किती आणि कसे कार्यक्षम आहात हे जिल्ह्यातील जनतेला चांगलेच माहित आहे. सतत राणे परिवाराचा द्वेष करायचा, अपप्रचार करायचा आणि राजकीय पोळी भाजून घ्यायची. हा तुमचा फंडा आता कालबाह्य झाला आहे. जिल्ह्यातील जनतेला माहित आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा विकास झाला आहे.त्यामुळे पारकर यांनी यातून योग्य संदेश घ्यावा आणि उगाचच आमदार नितेश राणे यांच्या वर टीका करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत असायला हवी ती पारकर यांच्यात नाही. कणकवली शहरात पारकर यांच्या बाबतीत काय चर्चा असते हे कधीतरी अभ्यासावे. त्यामुळे पारकर यांनी स्वतःच्या पक्षासाठी वेळ देऊन काम करावे नाहीतर कावेबाज आणि धूर्त सतीश सावंत कधी असलेले जिल्ह्यप्रमुख पद काढून घेतील हे समजणार नाही, असा टोलाही अंकुश जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिला आहे.