कोलेवाडी ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर
लांजा(प्रतिनिधी) तालुक्यातील कोलेवाडी येथे इको सेन्सिटिव्ह झोन मधील काळा दगडाचे उत्खनन खडी क्राशर तातडीने बंद करा अशी मागणी कोलेवाडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून सोमवारी ३० ऑक्टोबर रोजी ग्रामस्थ मोठ्या संख्येने येऊन लांजा तहसीलदार यांना निवेदन सादर करणार आहेत.
कोलेवाडी गाव हे इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये मोडते . असे असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काळ्या दगडाचे उत्खनन सुरू आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून या परिसरातील वन्यजीवन विस्कळीत झाले आहे .या ठिकाणी सुरू असलेल्या क्रशरमुळे आणि बोअर ब्लास्टिंगमुळे भू-गर्भातील पाणी पातळीवर देखील परिणाम झाला असल्याने कोलेवाडी गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण झालेली आहे.
मोठमोठ्याने होणाऱ्या बोअर ब्लास्टिंगमुळे येथील काही घरांना तडे गेले आहेत. दिवसेंदिवस घरांना हादरे बसत असल्याने ग्रामस्थांना घरात राहणे देखील कठीण झाले आहे. दिवसा अनेक कुटुंब जीव मुठीत घेऊन राहत आहेत. तसेच कोलेवाडी गावचे ग्रामदैवत या खडी क्रशरच्या जवळ असल्याने मंदिराला देखील धोका निर्माण झाल्याने ग्रामस्थांच्या देखील धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत.
उत्खनन होत असलेल्या ठिकाणापासून जवळच पालू नदी वाहत असल्याने या नदीवर कोलेवाडी आणि पालू गावच्या पाण्याचा स्त्रोत्र अवलंबून आहे. अशाच वेळी या क्रशरमुळे दूषित पाण्याचा पुरवठा देखील होत असल्यामुळे सदर काळ्या खडीचे उत्खनन व खडी क्रशर तातडीने बंद करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
या सार्या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक ३० ऑक्टोबर रोजी लांजा तहसीलदार यांना ग्रामस्थांचे एक शिष्टमंडळ भेटणार असून याबाबतचा इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये उत्खनन कसे सुरू आहे याचा जाब विचारणार आहोत.
अशा वेळी जर का प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्यास ग्रामस्थ स्वतःहून त्या ठिकाणी सुरू असलेला क्रशर बंद पाडून तेथील कामगारांना हाकलून लावण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतलेली आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासनाची जवाबदारी असेल असे सांगून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे.