इन्सुली एक्साइजची कारवाई
बांदा : प्रतिनिधी
इन्सुली एक्साइजच्या पथकाने कंटेनरवर कारवाई करताना ७२ लाखांच्या गोवा बनावटीच्या दारूसह एकूण १ कोटी २ लाख ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी राजस्थान येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी पहाटे ५ वाजता इन्सुली तपासणी नाक्यावर करण्यात आली. जगदीश देवाराम बिष्णोई (मुळ रा. जालोर, राजस्थान, सध्या रा. सुरत गुजरात) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोव्याहून राजस्थानच्या दिशेने गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती उत्पादन शुल्क खात्याच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सोमवारी पहाटेच इन्सुली तपासणी नाक्यावर सापळा रचण्यात आला होता. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास दहाचाकी कंटेनरला (एनएल ०१ एजी ९२५२) तपासणीसाठी थांबविण्यात आले. सुरुवातीला चालकाने पाठीमागील हौद्यात मशीनरीचे स्क्रॅप साहित्य असल्याची माहिती दिली. यावेळी त्याने बनावट पास व कागदपत्रे सादर केली. मात्र पथकाला संशय आल्याने सील तोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
सील तोडून तपासणी केली असता आतमध्ये ड्रीम्स डिस्टलरीज गोवा निर्मित गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या दारूचे खोके आढळले. पथकाने रॉयल ग्रेन्ड माल्ट व्हिस्कीच्या १८० मिली मापाच्या १ हजार कागदी खोक्यातून ७२ लाख रुपये किमतीच्या तब्बल ४८ हजार बाटल्या जप्त केल्यात. तसेच ३० लाख रुपये किमतीचा कंटेनर व ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण १ कोटी २ लाख ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क खात्याचे सिंधुदुर्ग अधीक्षक वैभव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली इन्सुली तपासणी नाका निरीक्षक संजय मोहिते, दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, प्रदीप रासकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, दीपक वायदंडे, प्रल्हाद माळी, रणजित शिंदे यांच्या पथकाने केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर करीत आहेत.