कोतवाल पदाच्या भरतीला स्थगीती दयावी व स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दयावे-अजित यशवंतराव

राजापूर (वार्ताहर): कोतवाल पदाची भरती प्रक्रीया राबविताना त्या-त्या गावातील वा सजातील इच्छुक उमेदवारांना अधिक संधी मिळणे आवश्कय असून विद्यमान भरती प्रक्रियेला स्थगिती द्यावी व नव्याने भरती करताना स्थानिक उमेदवाराला संधी दयावी अशी मागणी राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी केले आहे. तसे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना दिले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रिक्त असलेल्या जागांसाठी कोतवाल भरती केली जात आहे. प्रशासनाकडून ही भरती प्रक्रीया राबविण्यात येत आहे. विविध संवर्गातील कोतवाल पदासाठी आरक्षण निश्‍चित करताना त्या-त्या गावातील वा सजातील लोकसंख्येच्या निकषाचा प्राधान्याने विचार झाल्याचे समजते. मात्र, त्या-त्या गावातील वा संवर्गातील आरक्षणानुसार उमेदवारी अर्ज मागविताना त्या-त्या गावातील उमेदवारंसह संपूर्ण तालुक्यातील इच्छुक उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही गावातील वा सजातील आरक्षणानुसार पात्र असणारे तालुक्यातील कोणत्याही गावातील उमेदवारांना भरती प्रक्रीयेच्या माध्यमातून कोतवाल म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

असे असले तरी, संपूर्ण तालुक्यातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागणविण्याऐवजी त्या-त्या गावातील वा सजातील इच्छुक उमेदवारांना त्या-त्या गावामध्ये वा सजामध्ये उमेदवारी अर्ज करण्यास प्राधान्य मिळाल्यास गावातील इच्छुक उमेदवारांना स्थानिक पातळीवर वा गावामध्ये रोजगार मिळण्याची अधिक संधी मिळणार आहे. त्यातच, त्या-त्या गावातील वा सजातील स्थानिक उमेदवार त्या-त्या ठिकाणी कार्यरत राहील्यास त्याच्याकडे स्थानिक पातळीवरील उपलब्ध असलेली माहिती वा जनसंपर्काचाही प्रशासनाला गतीमान प्रशासकीय काम करण्यासाठी अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही कोतवाल पदाची भरती प्रक्रीया राबविताना त्या-त्या गावातील वा सजातील इच्छुक उमेदवारांना अधिक संधी मिळावी असे मला वाटते. तरी या भरती प्रक्रियेला स्थगिती द्यावी व नव्याने भरती करताना या गोष्टीचा कोतवाल भरती प्रक्रीया राबविताना सकारात्मक विचार व्हावा अशी मागणी अजित यशवंतराव यांनी केली आहे.