गुहागर तालुक्यात ३० एकर क्षेत्रात कलिंगड लागवड!

पाण्यात विरघळणा-या खतांबरोबरच सुक्ष्मअन्नद्रव्यांची गरज

मढाळ येथे कलिंगड प्रात्यक्षिक

पाटपन्हाळे | वार्ताहर : कलिंगड पिकाच्या योग्य वाढीसाठी तसेच उत्तम प्रकारे उत्पादना बरोबरच चांगल्या चवीचे कलिंगड उत्पादीत होण्यासाठी पिकाच्या विविध अवस्थेत पाण्यात विरघळणा-या खतांबरोबरच सुक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर करण्याची गरज असल्याची माहिती पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी दिली. पंचायत समिती गुहागर च्या सन २०२२-२३ या वर्षी राबविण्यात येणा-या कलिंगड लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत या प्रकल्पात भाग घेतलेलया शेतकऱ्यांसाठी मढाळ येथील प्रगतिशील शेतकरी नरेंद्र चव्हाण यांच्या शेतावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी पौनीकर यांनी ही माहिती दिली. कलिंगड पिक हे कमी कालावधीतील ‘कॅश क्राॅप’ असलेले पिक आहे. मात्र सुरूवातीला बियाण्याची पेरणी करताना ज्या पद्धतीने सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर वेलींची वाढ होताना पिकाच्या त्या -त्या अवस्थेत योग्य वाढीसाठी तसेच उत्तम प्रकारे उत्पादना बरोबरच चांगल्या प्रकारे चव निर्माण होण्यासाठी १९:१९:१९, १३:६१:०, १३:०:४५, ०:०:५० या पाण्यात विरघळणा-या खतांबरोबरच सुक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर योग्य प्रमाणात करणे गरजेचे असल्याचे मतही पौनीकर यांनी व्यक्त केले.

प्रगतीशिल शेतकरी नरेंद्र चव्हाण यांनी यावेळी त्यांचे कलिंगड लागवडीचे अनुभव सांगितले.केवळ चारच प्रकारचे नाही तर आणखी इतर प्रकारच्या ग्रेडच्या पाण्यात विरघळणा-या खतांचा वापर आवश्यक आहे. त्याचबरोबर योग्य प्रकारच्या कलिंगड जातीचा वापर करणे आवश्यक आहे. ज्या जातींमध्ये गोडवा अधिक व टिकाऊ पणा अधिक अशा कलिंगडला बाजारात मागणी अधिक असते असा अनुभवही त्यांनी यावेळी सांगितला.यावेळी कलिंगड लागवड करणारे शेतकरी लक्ष्मण कुंभार,समीर रहाटे, सतीश धावडे, तुषार ठोंबरे, रविंद्र कारकर, चंद्रशेखर गुरव, प्रवीण गावडे, दिपक चव्हाण,विजय रांजणे, यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.