खेड (प्रतिनिधी) खेड नगरपरिषद माझी वसुंधरा अभियान ४० व स्वच्छ भारत सर्वेक्षणांतर्गत दीपावली पार्श्वभूमीवर ;स्वच्छ दीपावली व शुभ दीपावली अभियान राबवणार आहे. यास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी केले आहे.माझी वसुंधरा अभियान ४० व स्वच्छ भारत सर्वेक्षणांतर्गत नगरपरिषदेकडून राबवण्यात आलेल्या सर्वच उपक्रमांना नागरिकांचा प्रतिसाद मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर स्वच्छ दीपावली व शुभ दीपावली अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
नगरपरिषद हद्दीतील सर्व फटाके विक्री करणारे व्यावसायिक व फटाके वापर करणाऱ्या नागरिकांना सूचना करत पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त दीपावली साजरी करण्याचे आवाहन केले आहे. अभियानांतर्गत फटाके, प्लास्टिक कचरा व प्रदूषणमुक्त आणिपर्यावरणपूरक उत्सव साजरे करण्याचा प्रयत्न करण्यासंदर्भातही सूचित केले आहे. तसेच नागरिकांनी फटाक्यांचा व प्लास्टिकचा वापर टाळून कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहनही केले आहे.सण, समारंभांमध्ये टाकाऊ व पुनर्वापर करण्यायोग्य वस्तूंचा वापर जास्तीत जास्त करून पर्यावरणपूरक प्रदूषणमुक्त दीपावली साजरी करण्याचे आवाहनही प्रभारी मुख्याधिकारी शिंगटे यांनी केले आहे.











