खेड तालुक्यातील पहिली महिला सैनिक; बोरजगावची सुकन्या ऋतुजा सनगरे देशसेवेसाठी सज्ज

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्याच्या इतिहासात अभिमानाची नोंद करत बोरजगाव येथील सुकन्या ऋतुजा राजेंद्र सनगरे हिने भारतीय सैन्यात भरती होऊन तालुक्याचे नाव उंचावले आहे. खेड तालुक्यातून सैन्यात भरती होणारी ती पहिली महिला सैनिक ठरली असून तिच्या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऋतुजा हिने बोरज येथील नॅशनल कॅम्प अकॅडमीमध्ये भरतीपूर्व प्रशिक्षण घेतले. कठोर परिश्रम, शिस्तबद्ध सराव आणि देशसेवेची जिद्द यांच्या बळावर तिने भारतीय सैन्यात यशस्वी प्रवेश मिळवला. त्यानंतर पंजाब येथे तिने तब्बल १३ महिन्यांचे सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केले. या कालावधीत तिने शारीरिक, मानसिक आणि तांत्रिक कौशल्यांचा कस लावणारे कठोर प्रशिक्षण घेतले.
प्रशिक्षण पूर्ण करून ऋतुजा सध्या आपल्या मूळ गावी बोरजगाव येथे दाखल झाली आहे. गावात तिचे उत्साहात स्वागत करण्यात आले. कुटुंबीय, नातेवाईक तसेच ग्रामस्थांनी तिचा सत्कार करून शुभेच्छांचा वर्षाव केला. तिच्या या यशामुळे गावातील मुलींना नवे स्वप्न पाहण्याची प्रेरणा मिळत आहे.
आगामी १९ फेब्रुवारी रोजी ऋतुजा गुवाहाटी येथे रवाना होणार असून तेथून ती भारत-बांगलादेश सीमेवर देशसेवेची जबाबदारी पार पाडणार आहे. देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी सज्ज झालेली ही खेड तालुक्याची कन्या आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून, भविष्यातही ती देशसेवेत उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.