पाटपन्हाळे हायस्कूल व भावार्थ ग्रंथालय चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यवाचन स्पर्धा संपन्न
पाटपन्हाळे | वार्ताहर : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमानिमित्त गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयात पाटपन्हाळे विद्यालय व भावार्थ ग्रंथालय चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच काव्यवाचन स्पर्धा मुख्याध्यापक श्री.एम.ए.थरकार यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली. सदरच्या काव्यवाचन स्पर्धेत वेदांत महेंद्र गुरव या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक संपादन केला. कु. हर्षदा संदीप पालकर – द्वितीय क्रमांक , कु.मृण्मयी दत्ताराम जाधव – तृतीय क्रमांक तसेच आसमा फिरोज शेख व सिद्धी शांताराम तांबे या विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ क्रमांक संपादन केला.
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे व भावार्थ ग्रंथालय चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या दिप प्रज्वलनाने व ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांची प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते होऊन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व मान्यवर तसेच विद्यार्थी प्रतिनिधी यांचे पाटपन्हाळे विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातर्फे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.इयत्ता सातवी ते दहावी या विद्यार्थ्यांसाठी सदरची काव्यवाचन स्पर्धा संपन्न झाली. सदर स्पर्धेतील बहुसंख्य सहभागी विद्यार्थ्यांनी कवी राजा बढे , बालकवी , सुरेश भट , गुरु ठाकूर शांता शेळके , आदी नामवंत कवी व कवयित्रींच्या कविता उत्तम प्रकारे सादर केल्या. सदर कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून भावार्थ ग्रंथालय चिपळूणचे व्यवस्थापक विवेक कदम , विनायक पाध्ये , प्रेरणा करंदीकर , भालचंद्र पवार पाटपन्हाळे हायस्कूलचे मुख्याध्यापक एम.ए.थरकार , पाटपन्हाळे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.संजीव मोरे , सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख व मराठीच्या शिक्षिका सौ.एस.एस. चव्हाण , मराठी विषय शिक्षक श्री.एस.एम.आंबेकर , श्री.एस. एस.घाणेकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाध्यक्ष श्री.एम.ए.थरकार , भावार्थ ग्रंथालयाचे व्यवस्थापक विवेक कदम व परीक्षक विनायक पाध्ये यांनी बहुसंख्य विद्यार्थी काव्यवाचन स्पर्धेत सहभागी होऊन उत्तम प्रकारे कविता सादर केल्याबद्दल आयोजक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.तसेच विद्यार्थ्यांनी वाचन केले पाहिजे, नामवंत साहित्यिकांच्या कविता वाचून काव्य रचना , कवितेचा आशय , शब्दमांडणी आदी महत्त्वाच्या बाबी समजून घेतल्या पाहिजेत याबाबत मार्गदर्शन केले.काव्यवाचन स्पर्धेचे परीक्षक म्हणून भावार्थ ग्रंथालयाचे विनायक पाध्ये व पाटपन्हाळे हायस्कूलचे मराठी शिक्षक श्री. एस.एम.आंबेकर यांनी काम केले. भावार्थ ग्रंथालय चिपळूणतर्फे काव्यवाचन स्पर्धेतील प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांकाचे सुयश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र , शालेयपयोगी वस्तू , भेटवस्तू व गुलाबपुष्प या स्वरूपात व उत्तेजनार्थ क्रमांक संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व गुलाबपुष्प मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सदरच्या काव्यवाचन स्पर्धा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.एस. एस.चव्हाण यांनी केले. भावार्थ ग्रंथालय चिपळूण , मान्यवर व बहुसंख्य सहभागी विद्यार्थी यांचे कार्यक्रमासाठी उत्तम सहकार्य लाभल्याबद्दल शिक्षक श्री.एस.एम.आंबेकर यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.











