धोकादायक विद्युत खांब न बदलल्यामुळे प्रजासत्ताकदिनी उपोषण

वेळंब उपसरपंच श्रीकांत मोरे यांचे महावितरणला निवेदन

गुहागर | प्रतिनिधी :तालुक्यातील वेळंब येथील धोकादायक विद्युत खांब गेली अनेक वर्षे महावितरणकडे वारंवार पाठपुरावा करूनही बदलण्यात आलेले नाहीत.महावितरणकडून होत असलेल्या या दुर्लक्षामुळे धोकादायक विद्युत खांब असलेल्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून महावितरणच्या या डोळेझाकपणावर आवाज उठवण्यासाठी प्रजासत्ताकदिनी गुहागर महावितरण कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा वेळंब उपसरपंच श्रीकांत मोरे यांनी नुकताच गुहागर महावितरण कार्यकारी अभियंता यांना पत्राद्वारे दिला आहे.यामध्ये म्हटले आहे की,वेळंब गावातील धोकादायक असलेले विद्युत खांब बदलण्यासाठी दिनांक 2 एप्रिल 2015 व दिनांक 9 ऑगस्ट 2021 असा दोन वेळा लेखी पत्रव्यवहार केला होता तर काही वेळा प्रत्यक्ष भेटूनही याबाबत विनंती केली होती.यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी हे धोकादायक विद्युत खांब आहेत त्याबाबतही माहिती दिली होती.मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाईलाजाने 26 जानेवारी रोजी गुहागर महावितरण कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.