जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पुजारा यांनी दिली सौंदळ येथील तुती लागवड क्षेत्राला भेट

शेतकऱ्यांचे केले कौतुक

राजापूर (वार्ताहर): रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार यांनी नुकतीच यशस्वीरीत्या तुती लागवड अन् रेशीम शेती करणारे तालुक्यातील सौंदळ शेतकरी आणि माजी सैनिक वासुदेव घाग यांच्या सौंदळ येथील तुती लागवड क्षेत्राला भेट दिली.

कोकणामध्ये तुती लागवडीच्या माध्यमातून रेशीम शेतीची रूजवात झाली असून राज्यशासनातर्फे तुती लागवड अन रेशीम शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचा लाभ घेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्षेत्र तुती लागवडीखाली आणण्याचा कृषी विभागाकडून प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर श्री. पुजार यांनी तुती लागवडीतील बारकावे समजून घेताना रेशीम शेती व्यवसायाचा नवा मार्ग शोधल्याबद्दल श्री. घाग यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचे कौतुक केले.

यावेळी श्री. पुजार यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विवेक गुंड, सहाय्यक गटविकास अधिकारी सुहास पंडीत, तालुका कृषी अधिकारी परेश सुर्वे, कृषी विस्तार अधिकारी प्रभाकर आपटे यांच्यासह उमेद विभागाच्या अर्चना भंडारी यांच्यासह तुती लागवड करणारे शेतकरी उपस्थित होते.

कोकणातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षामध्ये सातत्याने बदलणारे वातावरण, त्यातून प्रतिकूल राहणाऱ्या हवामानाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे खर्चाच्या तुलनेमध्ये उत्पन्न कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून भातशेतीकडे काहीशी पाठ फिरविली जात असल्याचे चित्र आहे. अशा पस्थितीमध्ये राजापूर-लांजा तालुक्यातील माजी सैनिक वासुदेव घाग, राजाराम पाटेकर, सुधीर पालकर, हनुमंत विचारे आणि अमर खामकर या प्रगतशील शेतकऱ्यांनी तुतीची लागवड करून त्या माध्यमातून कोकणामध्ये रेशीम शेतीचा यशस्वी प्रयोग केला.

शेती क्षेत्रातील नाविण्याचा ध्यास घेणाऱ्या या शेतकऱ्यांचे प्रयत्नाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार यांनी या भेटीच्यावेळी विशेष कौतुक केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना तुती लागवड अन् रेशीम शेतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रगतशील शेतकरी श्री.घाग आणि कुटुंबिय, सहकार्यांनी तुती लागवड, कोषनिर्मिती, मार्केटींग आदींविषयी सविस्तर माहिती श्री. पुजार यांना दिली.