
अध्यक्षपदी चंद्रकांत परवडी तर उपाध्यक्षपदी विलास दरडे यांची फेरनिवड
लांजा (प्रतिनिधी) शहरातील प्रतिथयश सहकारी पतसंस्था अशी ओळख असलेल्या कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या., लांजा या संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत परवडी यांची तर उपाध्यक्षपदी विलास दरडे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या., लांजा या संस्थेची सन २०२३-२४ ते २०२८-२९ या कालावधीकरीता संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर संचालक पदाच्या १३ जागांकरिता एकूण २० अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे दाखल झाले होते. अर्ज मागे घेण्याच्या तारखेला एकूण ९ अर्ज मागे घेण्यात आल्यामुळे संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले होते.
बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांमध्ये सर्वसाधारण प्रतिनिधी मतदार संघातून चंद्रकांत परवडी, विलास दरडे, नंदकुमार आंबेकर, शांताराम गाडे, चंद्रकांत धनावडे, गणेश जोशी, बाळकृष्ण जोशी, भालचंद्र कांबळे, राखीव इतर मागास प्रवर्गातून आत्माराम धुमक, राखीव महिला प्रतिनिधी मतदार संघातून श्रीम. दर्शना बेंद्रे, श्रीम.प्रज्ञा हरमले यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती. संस्थेची बिनविरोध निवडणूक होणेकरीता संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत परवडी यांनी यशस्वी प्रयत्न केले व संस्थेची बिनविरोध निवडणूक करून संस्था मोठ्या आर्थिक भारातून सुटली असल्यामुळे सर्व सभासद, कर्जदार व हितचिंतक यांचेकडून चंद्रकांत परवडी व सर्व संचालकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
दरम्यान संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीमध्ये चंद्रकांत परवडी यांचा अध्यक्ष पदासाठी व विलास दरडे यांचा उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने ते बिनविरोध निवडून आले. उपस्थित सर्व संचालकांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नवनिर्वाचित संचालक यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन सुधीर कांबळे यांनी काम पाहिले.











