वैभववाडी सकल धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन
वैभववाडी | प्रतिनिधी : राज्यात सुमारे अडीच कोटी धनगर समाजाची लोकसंख्या आहे. डोंगरदर्यात राहणाऱ्या भटकंती करून उपजीविका भागवणारे धनगर बांधव आजही विकासापासून वंचित आहेत.धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळालेच पाहिजे. धनगर समाजाला आरक्षण द्या. या मागणीचे निवेदन वैभववाडी तालुका धनगर समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. हे निवेदन तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
भारतीय राज्यघटनेने धनगर समाजाला एसटी प्रवर्गात स्थान दिले. मात्र गेल्या 70 वर्षांमध्ये सर्वच सरकारांनी आरक्षण अंमलबजावणी पासून फारकत घेतली आहे. मुख्यमंत्री साहेब तुमच्या हाती धनगर समाजाच्या उद्धाराची संधी आहे. धनगर समाजाने राज्यातील विविध ठिकाणी आमरण उपोषण केले. जिल्ह्यापासून ते गाव खेड्यापर्यंत आंदोलनाचे लोण पसरले आहेत.
सरकारने 50 दिवसाची मुदत दिली. ती देखील संपली असून आपण त्वरित धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करून धनगर समाजाला न्याय द्यावा अशा आशयाचे निवेदन देत धनगर समाजाच्या उद्धारासाठी खालील योजनेची मागणी धनगर समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे करण्यात आली. धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करा,मेंढपाळांसाठी घोषित केलेल्या दहा हजार कोटींच्या सहकारी मंडळाचे जिल्हास्तरीय संस्था स्थापन झाल्या असून लवकरात लवकर सहकार मंडळाची घोषणा करून योजना कार्यान्वित करण्यात यावी,व इतर योजनांचा या निवेदनात समावेश आहे.
यावेळी वैभववाडी सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर समाज बांधव नवलराज काळे, गंगाराम इंजू शिंदे, दाजी विठ्ठल बर्गे, अनिल कोकरे, ॲड. विक्रमसिंह विजयसिंह काळे, विलास फाले, चंद्रकांत बोडेकर, गंगाराम बोडेकर, दिगंबर गुरखे, सुनिता रामचंद्र झोरे, आनंदी रामचंद्र शेळके, ईशा रामचंद्र झोरे, लक्ष्मण बोडेकर, अथर्व जंगले व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.












