राजापुरात पुन्हा एकदा शिंदे गटाचा उबाठा गटाला जोरदार झटका

जि. प. चे माजी सभापती दीपक नागलेंचा शिवसेनेत प्रवेश

राजापूर l प्रतिनिधी : राजापूरात पुन्हा एकदा शिंदे गटाने उ. बा. ठाकरे गटाला जोराचा झटका दिला आहे. उ. बा. ठाकरे गटाचे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती व आ. राजन साळवींचे खंदे समर्थक दीपक नागले यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह रविवारी शिवसेनेत प्रवेश करत शिंदे शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे.

राजकारण व समाजकारण करत असताना भावनिक राजकारणापेक्षा विकास महत्वाचा असतो आणि तो विकास करण्यासाठी आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे नागले यांनी नमुद केले आहे.

 कोकणात शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होताना दिसत आहेत. उ. बा. ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी व सैनिक शिंदेच्या शिवसेनेत दाखल होत आहेत. राजापुरातही अनेकजण उबाठा कडून शिंदे शिवसेनेत जात आहेत. नागले यांचे किरण सामंत यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी जिल्हाप्रमुख राहुल पंडित शिवसेनेचे राजापूर तालुकाप्रमुख अशफाक हाजू आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

नागले यांच्यासोबत राजापूर तालुक्यातील मोगरे गावाच्या सरपंच वर्षा थारळी, उपसरपंच राजाराम नाचणेकर, माजी सरपंच वामन साखरकर, शाखाप्रमुख अनिल बावकर, मोगरे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष काशिनाथ सातोपे, उपाध्यक्ष पर्शुराम शेमणकर, सचिव चंद्रकांत साखरकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. कोंडसर बु. येथील माजी पं.स. उपसभापती सुहास वारिक आदींसह अनेकांनी प्रवेश केल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे. या सर्व प्रवेशकर्त्यांचा पक्षात योग्य सन्मान केला जाईल असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी शाखाप्रमुख, गटप्रमुख, युवाशाखाधिकारी, महिला संघटक, बुथ प्रमुख, वाडीप्रमुख, माजी सरपंच्यांसह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचबरोबर कशेळी गावातील कुणबी बँकेचे संचालक विद्याधर गोठणकर, कुणबी समाज सेवा संघाचे सचिव संदीप राड्ये, ग्रामपंचायत सदस्य अजय सुतार, संतोष प्रभू यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

भावनिकतेपेक्षा विकासाला महत्त्व – नागले

पक्षप्रवेशानंतर दीपक नागले यांनी सांगितले की, भावनिकतेपेक्षा आपण विकासाला प्राधान्य दिले. भावनिक राजकारण करून विकास होत नाही, जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत व किरण सामंत यांनी ग्रामीण भागातील विकास कामांना प्राधान्य दिले आहे. विकासाबरोबरच शिक्षण आणि आरोग्याची कामांना प्राधान्य मिळेल व खऱ्या अर्थाने विकास होईल म्हणून आपण प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले