खेड (प्रतिनिधी) खेड लायन्स ऑफ सिटीच्या वतीने २ ते ७ जानेवारी या कालावधीत महाडनाका येथील गोळीबार मैदानात लायन्स, फेस्टीवलचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे यांनी दिली.
लायन्स क्लब ऑफ माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवण्यावर भर देण्यात येत असून गरजूंना मदतीचा हात देखील दिला जात आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यावर देखील भर देण्यात येत आहे. या उपक्रमांसह नागरिकांच्या मनोरंजनासह एकाच ठिकाणी अल्पदरात वस्तूंची खरेदी करण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ सिटीने प्रथमच लायन्स फेस्टीवलचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या महोत्सवात सांस्कृतिक रेलचेलींसह मराठी कार्यक्रमांच्या सिनेतारकांची उपस्थितीही लाभणार आहे. याचवेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा देखील गौरव करण्यात येणार आहे. लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे, उपप्रांतपाल डॉ. विरेंद्र चिखले, सचिव सुरेश चिकणे, खजिनदार अनिल मोरे, कार्यक्रमप्रमुख पंकज शहा, उपकार्यक्रमप्रमुख राजा जोयसर यांच्यासह पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.










