मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रयत्न अतुलनीय – गृहराज्यमंत्री योगेश कदम

खेड (राकेश कोळी) :

राज्यातील मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले आहे की मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी ऐतिहासिक निर्णय घेतले असून त्यांचे प्रयत्न अतुलनीय आहेत. कदम म्हणाले की, शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी ज्या प्रमाणात पराकाष्ठा केली, त्याची दखल आज संपूर्ण मराठा समाज घेत आहे.

यावेळी कदम पुढे म्हणाले की, काही जण या संवेदनशील विषयावर सोयीस्कर राजकारण करत आहेत. मात्र, राज ठाकरे हे ज्येष्ठ नेते असून, मी एक छोटा कार्यकर्ता असल्याने त्यांच्या प्रतीकेवर बोलणे योग्य ठरणार नाही. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुरु असलेल्या चर्चेवर भाष्य करताना कदम यांनी स्पष्ट केले की, आंदोलन करणे हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि त्याला विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आंदोलनकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने, संयमाने आपली भूमिका मांडली आहे. सरकारने आंदोलनाची तारीख बदलण्याची विनंती केली असली तरी ती स्वीकारली नाही, मात्र संपूर्ण आंदोलन हे शिस्तबद्ध आणि नियंत्रित पद्धतीने सुरु आहे, असे त्यांनी नमूद केले.

त्याचबरोबर काही लोक जाणीवपूर्वक मराठा व ओबीसी समाजामध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. मात्र, मराठा समाज जागरूक असून अशा प्रयत्नांना यश मिळणार नाही, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला. हॉटेल व्यावसायिक आणि फेरीवाल्यांबाबतच्या अफवांवरही त्यांनी भाष्य केले. सरकार किंवा गृहविभागाने त्यांना कोणताही लिखित अथवा मौखिक आदेश जारी केलेला नाही, हे स्पष्ट करताना त्यांनी नागरिकांना अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले. सामाजिक एकता व शांतता टिकवणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचेही कदम यांनी सांगितले.