६२वी हौशी मराठी नाट्य स्पर्धा नाटक: दॅट नाईट लेखक-दिग्दर्शक चंद्रशेखर मुळे राधाकृष्ण कला मंच, रत्नागिरी
चिपळूण (प्रतिनिधी) : आजकाल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा जमाना आहे, असं म्हटलं जातं. व्हॉट्सअपवर एखादी कुठली तरी पोस्ट येते आणि आपण कुठलाही मागचा पुढचा विचार न करता ती फॉरवर्ड करतो. त्याच्या परिणामांची कल्पना करत नाही. आज धर्मा-धर्मांमध्ये तेढ निर्माण झालेली आहे, त्याचं कारण अनेकांनी आपले धर्मग्रंथ वाचलेले नसतात. कोणीतरी सांगतो… व्हॉट्सअपवर काहीतरी मेसेज येतो, म्हणून आपण तेच खरं आहे असं मान्य करतो. आपल्या धर्माविषयी चुकीचे असणारे मत, समज यामुळेच अनेकवेळा दोन समाजामध्ये तेढ निर्माण झालेली दिसून येते. यावरच भाष्य करणारे रत्नागिरीतील राधाकृष्ण कला मंच यांनी चंद्रशेखर मुळे लिखित, दिग्दर्शित दॅट नाईट हे नाटक सादर केलं.
राज्य हौशी नाट्य स्पर्धेच्या चौथ्या दिवशी सादर झालेल्या दॅट नाईट या नाटकातून हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्मांमध्ये एकमेकांविषयी असलेला आकस, एकमेकांविषयी असलेले गैरसमज, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. चंद्रशेखर मुळ्ये यांचे लेखन अत्यंत सकस आहे. या नाटकातील संवाद अनेक प्रसंगावर भाष्य करतात. धर्माविषयी असणारा मिस इंटरप्रिटेशन व यातून काय घडतं हे सांगताना धर्म म्हणजे सत्य असं रसिकांसोबत मांडलं गेलं आहे. कोणता धर्म हिंसा सांगत नाही, तर सर्वच धर्म शांती सांगतात आणि तेच खरं धर्माचे सार आहे हे या नाटकातून अगदी सहजपणे चंद्रशेखर मुळे यांनी सांगितले आहे. देशपांडे नावाचं हिंदू कुटुंब, या कुटुंबातील मुलगी चित्रा धर्मामध्ये असणारे मिस इंटरप्रिटेशन यावर अभ्यास करीत असते.
यातूनच देशपांडे यांचे मित्र आपटे, सोनटक्के व अन्य मंडळींशी तिचे वाद होतात. नव्या पिढीतील चित्रा आपली मते ठामपणे सांगते. हिंदू असूनही आपल्या घरामध्ये कुराण आणते. त्याचा अभ्यास करते. इतरांचा धर्म काय सांगतो हे वाचल्याशिवाय आपली मत ठरवायची नाहीत, असे सांगते. चित्रा कुराण वाचते, बायबल वाचते आणि भगवद्गीताही वाचते. देशपांडे यांचे मित्र आपटे यांना भगवद्गीतेतील काही श्लोक ती विचारते, धर्माचा अर्थ विचारते, भगवद्गीता वाचली का विचारते, मात्र यातील एकाही प्रश्नाचे ठामपणे उत्तर आपटे देऊ शकत नाहीत. यावरूनच आपण आपलेच धर्मग्रंथ वाचलेले नसतात आणि आपणच आपल्या धर्माविषयी मिस इंटरप्रिटेशन करतो, हेच यातून दाखवले आहे.
दॅट नाईट या नाटकामधून अतिरेकी जन्माला येत नसतो, तर घडवला जातो, हे दोन तीन प्रसंगातून सहजपणे सांगितले आहे. एक मुस्लिम कुटुंब मंदिरामध्ये मांसाचा तुकडा टाकतो, असा गैरसमज केला जातो आणि या कुटुंबातील आई-वडिलांची हत्या केली जाते. रियाजच्या डोक्यात हिंदूंनी आपले आई-वडिलांचे केलेली हत्या हे फिट्ट बसलेली असते. त्यातच त्याच्या मोहसीन या मित्राचं हिंदू मुलीशी प्रेम असल्यामुळे त्यालाही हिंदू समाजाकडून मारहाण केली जाते. मुस्लिम मुलाने हिंदू मुलीवर प्रेम करून तिच्याशी लग्न केलं तर त्याला लव्ह जिहाद असं म्हटलं जातं, असं तो रागाने सांगतो. यातूनच तो अतिरेकी संघटनेची जोडला जातो. बॉम्ब हातात घेऊन काश्मीरला बॉम्बस्फोट करण्यासाठी जातो. याचवेळी देशपांडे यांची मुलगी चित्रा हीही कश्मीरला पोहोचते. दोघेही एका हिमनदीच्या पुरामध्ये एका बेटावर अडकतात. चित्रा त्या मुलाला वाचवते. मध्यंतरानंतर या दोघांचाच संवाद घडत राहतो. रियाज चित्रावर बलात्काराचा प्रयत्न करतो, त्याचवेळी चित्रा कुराणातील आयात बोलतो. त्यामुळे रियाज बाजूला होतो.
धर्माविषयीची असणारी मते, द्वेष, मस्तर खोडले जातात. अचानक चित्रा पाण्यात कोसळते. त्याचवेळी हा मुस्लिम रियाज हिंदू चित्राला वाचवतो. अचानक वरून हेलिकॉप्टर घिरट्या घालत असतं, त्यावेळी हेलिकॉप्टरमधून आवाज येतो, आम्ही केवळ एकालाच वाचू शकतो. तेव्हा रियाज चित्राला वाचवा, असे सांगतो. इन्सान इंसान के काम नही आयेगा तो जीने का क्या मतलब…. या संवादाने या नाटकाचा शेवट होतो. या नाटकातील सर्वच कलाकारांनी अतिशय उत्तमपणे आपल्या भूमिका साकारल्या आहेत. ज्येष्ठ रंगकर्मी राजकिरण दळी यांनीही आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. प्रकाश योजनेची बाजू थोडीशी कमजोर असल्याचे दिसून आले, पण नेपथ्यातून कसर भरून काढण्याचा प्रयत्न केला गेला आहे. जवळपास २३ कलाकारांचा या नाटकात सहभाग आहे हे २३ कलाकारांचा योग्य वापर करून घेतला आहे.
पात्र परिचय- रियाज: दीपक माणगावकर, चित्रा: मुक्ता शंबेकर, आई: मीना खेडेकर, बाबा: सुहास साळवी सोनटक्के: दीपेश काळे, आपटे: राजकिरण दळी, रिजवान: प्रसाद सुर्वे, मोहसीन: मयुरेश पाडावे, आम्मी: अंकिता नाचणकर, छोटा रियाज: उन्मेश खेडेकर, छोटी चित्रा: मुक्ता बापट, दिपाली: श्रावणी भोसले, अनिता: राधा टिकेकर, अपेक्षा: अपेक्षा सकपाळ, विरकर काका: संदीप वीरकर, सावंत काका: श्रीधर सावंत, सम्या: संदीप जोशी, मंगेश: स्वप्नील धनावडे, नेपथ्य: प्रशांत साखरकर, प्रकाश योजना: चंद्रशेखर मुळ्ये, पार्श्वसंगीत: निखिल भुते, रंगभूषा: ओंकार पेडणेकर, वेशभूषा: मोहन बापट.













