संशोधकांनी बौद्धिक संपदा अधिकाराबाबत जागृत असले पाहिजे- प्रा. सचिन लोकापुरे

 

चिपळूण (प्रतिनिधी) : सध्याचे युग हे माहितीचे युग म्हणून संबोधले जाते. या युगात माहितीला आणि ज्ञानाला महत्व आहे. त्यामुळे संशोधक आणि अभ्यासकांनी निर्माण केलेले दर्जेदार ज्ञान अबाधित ठेवायचे असल्यास त्यांनी बौद्धिक संपदा अधिकाराबाबत जागृत असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन तरुण उद्योजक तसेच सांगली जिल्ह्यात ‘फुन्सुक वान्गडू’ म्हणून परिचित असलेले, ३५० पेटंटस नावावर असणारे प्रा. सचिन लोकापुरे यांनी नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डी.बी.जे. महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आयोजित ‘बौद्धिक संपदा अधिकार’ या राज्यस्तरीय कार्यशाळेत काढले.

आपल्या सादरीकरणात प्रा. लोकापुरे यांनी बौद्धिक संपदा अधिकाराशी निगडीत सर्व महत्वाच्या बाबींचा उल्लेख केला. यामध्ये पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क, औद्योगिक आराखडे, व्यापारातील गुपिते, भौगोलिक संकेत यावर सखोल चर्चा केली. विचारवंतानी तसेच संशोधकांनी आपल्या नवनवीन कल्पना मांडून त्या बौद्धिक संपदा अधिकारामार्फत संरक्षित कराव्यात, जेणेकरून त्या कल्पनांचा गैरवापर कोणी करू नये. नवीन शोध लावण्यास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे तसेच मूळ ज्ञानाचा वापर करून आपले साहित्य जगभर पोचवावे, असे उद्गार प्रा. लोकापुरे यांनी काढले. या एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेत संपूर्ण जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून संशोधक, आणि प्राध्यापक उपस्थित होते.

कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट तसेच नवकोंकण एज्युकेशन सोसायटीचे श्री. अविनाश जोशी, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख प्रा. यू.ए. बामणे तसेच कार्यशाळेचे आयोजक डॉ. एस.पी. मोरे आदी उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ. माधव बापट यांनी बौद्धिक संपदा अधिकाराचा शैक्षणिक क्षेत्रात काय महत्व आहे याचे विवेचन केले. तसेच प्राध्यापकांनी नवनिर्मितीला प्रोत्साहन देवून स्वत:ही नव-नवीन कल्पना मांडून ज्ञान निर्मिती केली पाहिजे आणि हे ज्ञान जगाच्या कानाकोप-यात पोहोचावे यासाठी बौद्धिक संपदा अधिकाराचा आधार घेवून आपला उत्कर्ष साधावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. सुनील भादुले यांनी तर प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय प्रा. सौ. अर्चना कांबळी यांनी करून दिला. समन्वयक डॉ. एस.पी. मोरे यांनी प्रास्ताविक केले. आभार आय.क्यू.ए.सी. प्रमुख प्रा. यू. ए. बामणे यांनी मानले.