सिंधुदुर्ग जिल्ह्याने महाराष्ट्राला दोन ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक दिले : प्रवीण बांदेकर

Google search engine
Google search engine

भाषा संचालनालय महाराष्ट्र शासनाच्यावतीने ३६ जिल्हे ३६ व्याख्याने कार्यक्रम

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे आयोजन

सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठी संत परंपरा असून आहे. यातुनच जिल्ह्यात अनेक साहीत्यिक निर्माण झालेले आहेत. या जिल्ह्याने महाराष्ट्र राज्यातील चार ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखकांमध्ये दोन लेखक दिले. यामध्ये वि. स. खांडेकर व विंदा करंदीकर या दोन लेखकांचा समावेश होतो, अशी माहिती

व्याख्याते तथा साहित्यीक प्रवीण बांदेकर यांनी दिली.

भाषा संचालनालय महाराष्ट्र शासनाच्यावतीने ३६ जिल्हे ३६ व्याख्याने या कार्यक्रमाच्या अंतर्गत श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये सुप्रसिद्ध कादंबरीकार व लेखक साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रवीण दशरथ बांदेकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ‘सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वाङमयीन योगदान ‘ या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत

खेमसावंत भोंसले होते तर व्यासपीठावर संस्थेचे संचालक प्रा. डी टी देसाई, मराठी भाषा संचनालयाचे पर्यवेक्षक संदीप साबळे , सहाय्यक भाषा संचालक शरद यादव, पर्यवेक्षक अजित पवार, अभय राजे कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल, मराठी विभाग प्रमुख प्रा. एम बी बर्गे महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषा संचनालयाचे पर्यवेक्षक संदीप साबळे यांनी केले.

प्रवीण बांदेकर म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक लेखक होऊन गेलेले आहेत यामध्ये वि.स. तथा भाऊसाहेब खांडेकर, विंदा करंदीकर ,मंगेश पाडगावकर,

केशवसुतांचाही सावंतवाडी मध्ये मुक्काम होता, संध्याकाळी ही कविता त्यांनी सावंतवाडी मध्ये लिहिलेली आहे,चिं.त्र्यं. खानोलकर तथा आरती प्रभु , नाटककार जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक , ह.मो. मराठे ,कवी वसंत सावंत, नवीन पिढीतील उषा परब, वृंदा कांबळी ,शितल परब ,

गोविंद काजरेकर ही लेखकमंडळी चांगले लिहीत आहेत.

येथील राजघराण्यानेही नेहमीच साहित्यिकांना प्रोत्साहन दिलेले आहे याचं उदाहरण म्हणजे श्रीरामसावंत भोंसले यांनी विठ्ठल पुरुषोत्तम पिंगुळकर यांनी १९११ मध्ये लिहिलेल्या ‘सावंतवाडी संस्थान’ या पुस्तकाचा संपूर्ण खर्च संस्थांनच्या वतीने उचललेला होता. त्यानंतर राणी पार्वतीदेवी साहेब यांनी काही बंगाली पुस्तकांचा मराठी अनुवाद केलेला होता.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असलेली जी संत परंपरा आहे त्यामध्ये संत सोयरोबानाथ आंबिये,संत गोपाळबुवा( गोसावी) , माणगावचे प.प.वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी त्याकाळी विपुल लेखन केले आहे. अंतरीचा ज्ञानदिवा मालवु नको रे असे म्हणणारे संत सोयरोबानाथ अशी ही संतपरंपरा व यातुनच नवीन वक्ते व साहीत्यिक निर्माण झालेले आहेत, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष युवराज लखमसावंत भोंसले यानी अध्यक्षपदावरुन बोलतांना सांगितले की पूर्वीच्या काळापासून संस्थान नेहमीच कलाकार व लेखकांना प्रोत्साहन देत आलेले आहे.श्रीरामसावंत भोंसले यांनी त्या काळामध्ये पुस्तक प्रकाशनासाठीआर्थिक मदत केली . येथील अनेक कलांना उर्जितावस्थेमध्ये आणण्यासाठी राजेसाहेब शिवरामराजे भोंसले तसेच राजमाता यांनी फार मोठे योगदान दिलेले आहे. दशावतार कलेला प्रोत्साहन देण्यासाठी जसे आम्ही दशावतार महोत्सवाच्या आयोजन केलेले होते तसेच इतर कलाना व लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत. असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे आभार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी मानले.

Sindhudurg