मंडणगड आगार व्यवस्थापनाचे गचाळ कारभाराचे विरोधात रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे यांचा आंदोलनाचा इशारा

मंडणगड l प्रतिनिधी : आगार व्यवस्थापक मंडणगड यांच्याकडे वेळोळी तोंडी सुचना व लेखी निवदेन देवूनही बसस्थानकातून सुटणाऱ्या गाड्या वेळेत न सोडता दोन दोन तास उशीराने सोडण्यात येतात, आगारातील अनेक गाड्या नादुरुस्थ आहेत त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थी, जेष्ठ नागरीक, महिला पर्यायाने तालुक्यातील तमाम जनतेचे शैक्षणीक व आर्थीक नुकसान होत आहे

याचबरोबर नागरीकांना मानसीक त्रासास सामोरे जावे लागत आहे. याबाबत तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती व नागरीकांनी आगार व्यवस्थापकांना भेटून समस्या सोडवण्यासाठी निवेदन दिले आहे. यावर मार्ग काढण्यात यावा याकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे जिल्हा सरचिटणीस नगरसेवक आदेश मर्चंडे यांनी विभाग नियंत्रक राज्य परिवहन रत्नागिरी यांची रत्नागिरी येथे 23 नोव्हेंबर 2023 रोजी भेट घेवून सविस्तर चर्चा करत लेखी निवेदन सादर केले व आगार व्यवस्थापनाच्या गचाळ कारभारात सुधारणा न झाल्यास 15 डिसेंबर 2023 रोजी मंडणगड येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

निवेदनातील माहीतीनुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका शाखा मंडणगड यांच्यावतीने आगारव्यवस्थापक मंडणगड यांच्या गलथान कारभाराविरोधात 15 ऑगस्ट 2023 रोजी उपोषणाचा इशारा देण्यात आला होता.

पंरतू 13 ऑगस्ट 2023 रोजी तहसिलदार मंडणगड यांच्या दालनात मंडणगड आगार प्रतिनिधी व पक्षाचे पदाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या सभेत ढिसाळ व गलथान कारभारात तातडीने सुधारणा करण्यात येईल असे आश्वासीत करण्यात आले होते पंरतू आजअखेर आगार व्यवस्थापनाचे कार्यपध्दतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. तालुक्यातील जनतेमध्ये या विरोधात आक्रोश व चिड निर्माण झालेली आहे. तसेच मंडणगड बसस्थानकाच्या आवारातील स्वच्छता गृह हे घाणीचे साम्राज्य झाल्याने महिला पुरुष व नागरीकांना मोठा त्रास होत आहे.

10 डिसेंबर 2023 अखेर सर्व समस्या मार्गी न लावल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका शाखा मंडणगड यांच्यावतीने 15 डिसेंबर 2023 तीव्र आंदोलन करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील असे स्पष्ट करण्यात आले. रत्नागिरी येथे झालेल्या चर्चेकरिता नगरसेवक आदेश मर्चंडे यांच्यासमवेत जिल्हा संघटक विजय खैरे, प्रसिध्दीप्रमुख विधान पवार, युवा सरचिटणीस संकेत कासारे, योगेश कासारे, अतूल कासारे हे कार्यकर्ते उपस्थित होते.