चिपळूण (प्रतिनिधी) : “देण्याची भावना दातृत्व शिकविते, ज्या शाळेत शिकलो, घडलो आणि इथपर्यंत पोहोचले, त्या शाळेचे ऋण फेडणे म्हणजे आपले कर्तव्य पार पाडणे होते. माणसाकडे दातृत्व नसेल तर सर्व व्यर्थ आहे” असे उद्गार मुंबई गुरव ज्ञाती समाजाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सहसचिव सुनिल पवार यांनी काढले. दि. २९ नोव्हेंबर रोजी चिपळूण तालुक्यातील दादर प्राथमिक शाळेला सुनिल पवार आणि त्यांच्या संस्थेच्या पदाधिकारी वर्गाकडून संगणक संच प्रदान करण्यात आला. यावेळी दादर प्राथमिक शाळेमध्ये झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून सुनिल पवार बोलत होते.
दादर-कळकवणे ग्रामपंचायत सदस्य सुरज पवार यांच्या पुढाकाराने संगणक संच शाळेला देण्यात आला. विशेष म्हणजे सुनिल पवार हे देखील याच गावचे सुपुत्र असून या शाळेचे माजी विद्यार्थी देखील आहेत. हाच धागा पकडून त्यांनी आपल्या मार्गदर्शनात पुढे सांगितले कि, आपण शाळेत शिकतो, नोकरी धंद्यानिमित्ताने गाव सोडतो, मात्र लक्ष गावाकडेच असते. याच भावनेतून आम्ही हा संच देत आहोत. त्यामुळे फार आम्ही वेगळे काही करीत आहोत असे नाही” या छोटेखानी कार्यक्रमाला चिपळूण तालुका गुरव समाजाचे अध्यक्ष विलास सकपाळ, संचालक विजय कदम यांनी देखील समयोचित संबोधन केले. दादर शाळेमध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला मुंबई गुरव ज्ञाती समाजाचे विद्यमान खजिनदार राजेंद्र चाळके, माजी खजिनदार विनायक जाधव, मुंबई गुरव ज्ञाती समाजाचे माजी संचालक दिपक पवार, दादर-कळकवणे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रविण पवार, ज्येष्ठ नागरिक यशवंत नलावडे, दिपक सकपाळ, ग्रामपंचायत सदस्या सौ. दिपा पवार, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.प्राप्ती सकपाळ, माजी उपसरपंच अनंत शिरळकर, शाळेच्या उपशिक्षिका सौ. मनाली मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मुख्याध्यापक धनंजय कुंभार यांनी केले












