दुकाने आणि आस्थापनावर मराठी पाट्या लावा, न लावणाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा उग्र आंदोलन 

रत्नागिरी शहर मनसेचा इशारा

रत्नागिरी | प्रतिनिधी : मराठी पाट्या /नामफलक लावण्यासंदर्भातील २०२२ मधील राज्यसरकार च्या सुधारित कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांची याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सर्व दुकाने व आस्थापनांना दोन महिन्यांची मुदत देत मराठी पाट्या/नामफलक बसवून घेण्याचे आदेशच दिले, ही मुदत दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ रोजी समाप्त झाली, यानंतर

जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी जिल्हाप्रशासनाकडून दुकान व आस्थापना मालक यांना दिनांक ५ डिसेंबर पर्यंत वाढीव मुदत दिली. मात्र ही मुदत उलटून ही प्रशासनाकडून यावर कारवाई न झाल्याने, एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा हा अवमानच आहे असे म्हणत मनसे च्या रत्नागिरी शहर पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक कामगार आयुक्त यांची भेट घेत शहरातील या नियमबाह्य पाट्या/ नामफलक असणाऱ्या दुकाने व आस्थापनांवर येत्या आठ दिवसात कठोर कारवाई न झाल्यास व ह्या पाट्या व नामफलक बदलले न गेल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना याविरोधात आपल्या पद्धतीने आक्रमक आंदोलन छेडेल असा इशारा दिला.

 

यावेळी मनसे शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, शहरसचिव अजिंक्य केसरकर, उपशहर अध्यक्ष गौरव चव्हाण, विभागअध्यक्ष सर्वेश जाधव, शाखाध्यक्ष साहिल वीर, मनसे नाविकसेना जिल्हाचिटणीस बिपीनशिंदे, रस्ते आस्थापना तालुकासंघटक सतीश खामकर, मनविसे शहर अध्यक्ष तेजस साळवी, माजी शहर अध्यक्ष अरविंद मालडकर, भाई साळवी आदी महाराष्ट्र सैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.