रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दलाच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून भारतीय तटरक्षक कार्यालय, रत्नागिरीने २७ जानेवारी रोजी आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले. शालेय मुलांमध्ये देशभक्ती जागृत करण्यासाठी आणि बुद्धिमान विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने तटरक्षक दिनानिमित्त आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
एक ‘क्विझ क्लॅन’ म्हणून एका शाळेचे स्पर्धक अशा रत्नागिरी शहरातील सहा नामांकित शाळा या सर्वसमावेशक प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या. यावेळी स्पर्धकांनी त्यांचे ज्ञान आणि सामान्य जागरूकता यांचे अतिशय सुंदर सादरीकण केले. डॉ. किशोर सुखटणकर, संचालक, मुंबई विद्यापीठ, रत्नागिरी उपकेंद्र हे या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे मुख्य अतिथी म्हणून लाभले होते तर भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीचे कमांडिंग ऑफिसर आणि भारतीय तटरक्षक वायू अवस्थान रत्नागिरीचे कमांडिंग ऑफिसर यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली.
तटरक्षक दलातर्फे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रश्नमंजुषा मास्टर श्रीमती कृती टामटा यांनी केले.
या स्पर्धेत सर्वंकष विद्या मंदिर ही शाळा विजेता ठरली तर नवनिर्माण हाय उपविजेता ठरली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी तर इतर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सहभागी शाळांनी आणि प्रेक्षकांनी या कार्यक्रमाची प्रशंसा केली. भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीचे कमांडिंग ऑफिसर यांनी स्पर्धक आणि शाळेच्या मुख्याध्यापकांचे आभार मानले.