३३ वी राष्ट्रीय किशोर-किशोरी खो-खो स्पर्धा
टिपटूर (कर्नाटक) (क्री. प्र.) : खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने कर्नाटक खो-खो असोसिएशन आयोजित ३३ वी राष्ट्रीय किशोर-किशोरी खो-खो स्पर्धा कल्पतरू क्रीडांगण टीपटूर, जिल्हा टुमकूर कर्नाटक येथे सुरु आहे. दूसऱ्या दिवशीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या दोन्ही संघाना विरोधी संघ अनुपस्थित राहिल्यामुळे गुण मिळाल्याने गटात अव्वल स्थान मिळाले आहे. उर्वरित सामन्यात किशोर गटात ओडीसा, उत्तरप्रदेश तर किशोरी गटात यजमान कर्नाटकसह पंजाबने विजयी वाटचाल सुरू ठेवली आहे. किशोर-किशोरी दोन्ही गटात मेघालय आणि नागालँड हे संघ स्पर्धेत सहभागी झालेले नसल्यामुळे महाराष्ट्राच्या दोन्ही संघाना विजयी गुण देण्यात आले.
उर्वरित सामन्यात किशोर गटामध्ये ओडीसाने कोल्हापूरचा २८-२४ असा ४ गुण आणि २.३० मि. राखून विजय मिळवला. ओडीसाच्या बापून हंसदा (३ मि. संरक्षण व २ गुण), बिजय तुईका (१.१५, १.२० मि. संरक्षण), बिकाराम मोहंती (नाबाद १.३० मि. संरक्षण व २ गुण) यांनी चांगला खेळ केला. पराभूत कोल्हापूरच्या कार्तिक फरकटे (२.१० मि. संरक्षण व ३ गुण) याने अष्टपैलु खेळ केला.
उत्तरप्रदेशने गोव्याचा २८-१४ असा एक डाव १४ गुणांनी एकतर्फी विजय मिळवला. विजयी संघाच्या देव कुमार (५.३० मि. संरक्षण व २ गुण), अनुप (२.५०, १.२० मि. संरक्षण व ४ गुण), अमन चौहान (१.१० मि. संरक्षण व ६ गुण) यांनी अष्टपैलू खेळ केला. पराभूत गोव्यातर्फे धिरज (१ मि. संरक्षण), दिपक (८ गुण) यांनी चांगला खेळ केला.
किशोरी गटात यजमान कर्नाटकने मणिपूरचा ४२-६ असा एक डाव ३६ गुणांनी धुव्वा उडवला. यजमान कर्नाटकच्या विजया लक्ष्मी (नाबाद ७ मि. संरक्षण), निंगमा डी (३.२० मि. संरक्षण), लावण्या व्ही (२.३० मि. संरक्षण व १६ गुण), बिबि फातिमा (८ गुण) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. मणिपूरकडून एल अल्बीनाने (४ गुण) चांगला खेळ केला.
दुसऱ्या सामन्यात पंजाबने ओडीसाचा ३०-१८ असा १२ गुणांनी पराभव केला. खुषप्रित (३.००, १.१० मि. संरक्षण व २ गुण), हरमन कौर (१.२०, २ मि. संरक्षण व २ गुण), रजनी राणी (८ गुण) यांनी उत्कृष्ट खेळ करत ओडिसा संघातर्फे महत्वाची भुमिका बजावली. ओडीसातर्फे लिडीना नाथ (१.२० मि. संरक्षण), सुभसनरी मल्लीका (६ गुण) यांनी चांगला खेळ केला.
अन्य सामन्यांमध्ये किशोरी गटात गुजरातने हिमाचलवर ३६-१८ असा १८ गुणांनी, तर दिल्लीने गोवा संघावर ३४-१२ अशी २२ गुणांनी मात केली. किशोर गटात झारखंडने मणिपूरवर (२८-१२) अशी १६ गुणांनी तर तामिळनाडूने मणिपूरवर (३४-१२) अशी २० गुणांनी मात केली.
दरम्यान, काल सायंकाळी किशोर-किशोरी राष्ट्रीय स्पर्धेचे उद्गाटन झाले. महाराष्ट्राकडून खो-खो फेडरेशनचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, राज्य खो-खो असासेसिएशनचे सरचिटणीस अॅड. गोविंद शर्मा उपस्थित होते.











