वर्धापन दिनाचे औचित्य; गोगटे जोगळेकरच्या खगोल अभ्यास केंद्राचे प्रा. बाबासाहेब सुतार व सहकारी यांचे मार्गदर्शन
रत्नागिरी | प्रतिनिधी : मोबाईल, टीव्ही याही पलीकडे आपल्या ज्ञानात भर घालणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात. मात्र त्याकडे मुलांचे लक्ष वेधण्याची जबाबदारी पालकांची असते. अशीच ज्ञानमय संधी रत्नागिरीतील विद्यार्थी आणि पालकांना उपलब्ध झाली असून यासाठी संपूर्ण अवकाशच त्यांना खुले राहणार आहे.
दिनांक 16 डिसेंबर रोजी रत्नागिरी येथील हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे तारांगण, माळनाका येथे तारांगणाचे वर्धापन दिनानिमित्त आकाशदर्शन कार्यक्रमाचे आयोजन उदय सामंत फाउंडेशन व रत्नागिरी नगर परिषद यांचे माध्यमातून करण्यात येत आहे. दुर्बीणीद्वारे अवकाशातील ग्रहगोलांना पाहण्याची संधी रत्नागिरीतील विद्यार्थी, पालक आणि विज्ञान प्रेमी रत्नागिरीकराना या निमित्ताने मिळणार आहे. यावेळी विविध नक्षत्रांची व तारकांची माहिती देण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या चांद्रयान, आदित्ययान यांच्या प्रतिकृतीही प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत व अन्य मान्यवरांचे उपस्थितीत गतवर्षी याच दिवशी तारांगणाच्या या वास्तूचे लोकार्पण करण्यात आले होते. वर्षभरात महाराष्ट्रभरातून आजवर सुमारे 22032 प्रेक्षकानी येथे हजेरी लावली आहे. यामध्ये सांगली, सातारा, मिरज कोल्हापूर तसेच कणकवली, चिपळूण आणि गोवा येथील पर्यटकांचा समावेश आहे. तसेच अलीकडे विविध ठिकाणच्या शालेय सहलींच्या यादीतही रत्नागिरी तारांगणाला पसंती दिली जात आहे. प्रसिद्ध खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण, आयुकाचे शास्त्रज्ञ समीर धुरडे यांनी तारांगणाला अलीकडेच भेट दिली आहे. तारांगणातील आर्ट गॅलरी आणि सायन्स गॅलरीही लवकरच सुरु करण्यात येत आहे.
बाळासाहेब ठाकरे तारांगणाच्या पुढील उपक्रमांचा एक भाग म्हणून वर्धापनदिनानिमित्त 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 ते 8.30 वाजेपर्यंत आकाशदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरीतील दुर्बीणी धारक खगोल प्रेमीनी आपल्या दुर्बीणी घेऊन आल्यास एक दुर्बीण मेळावाही या निमित्ताने पार पडेल आणि अधिक लोकांपर्यंत खगोल प्रसार होईल अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. यावेळी गोगटे जोगळेकर महाविद्यालयतील खगोल अभ्यास केंद्राचे प्रा. बाबासाहेब सुतार व सहकारी या उपक्रमात उपस्थिताना मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमासाठी रत्नागिरी येथील खगोलप्रेमी विज्ञान प्रेमीनी उपस्थित राहावे असे आवाहन रत्नागिरी नगर परिषद तसेच उदय सामंत फौंडेशन यांचेद्वारे करण्यात येत आहे.












