मळगांवचे ग्रामदैवत श्री देव मायापूर्वचारी मंदिराचा उद्या जत्रोत्सव

सावंतवाडी । प्रतिनिधी : मळगाव गावचे ग्रामदैवत श्री देव माऊली मायापूर्वेचारी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार १६ डिसेंबर रोजी होत आहे. तर श्री देव भूतनाथ मंदिराचा जत्रोत्सव १७ रोजी होणार आहे.श्री देव मायापूर्वचारी जत्रोत्सवानिमित्त पहाटे अभिषेक पूजा त्यानंतर देव मायापूर्वचारी व देवी माऊलीच्या मूर्तींना वस्त्रालंकारांनी सजविण्यात येणार आहे. त्यानंतर दर्शन सुरु होणार असून नवस बोलणे व फेडणे तसेच केळी व नारळ ठेवणे यासारखे कार्यक्रम होणार आहेत. रात्री १० वाजता सोनुर्ली जत्रोत्सवाप्रमाणेच पुरुष व महिला भाविकांची लोटांगणे संपन्न होणार आहेत. त्यानंतर रात्री उशिरा स्थानिक दशावतार कलाकारांचा दशावतार नाट्य प्रयोग सादर होणार आहे. तरी या जत्रोत्सवाला भाविक भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.