खेड(प्रतिनिधी) मोतीबिंदू, काचबिंदु, नेत्रपटलावर मधुमेहाचा वाढता प्रभाव ह्याचे त्वरित निदान आणि उपचार करण्याकरता वालावलकर रुग्णालयात आता सुसज्ज यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्याकरीता लागणारी अद्ययावत उपकरणे जसे की नॉन-कॉन्टॅक्ट टोनोमीटर उपलब्ध केले आहे. त्यामुळे डोळ्यांमधील दाब डोळ्याला स्पर्श ना करता मोजून काच बिंदूचे निदान आणि उपचार करता येणार आहे. तसेच ऑटो रे फ्रॅक्टर आणि केराटो मीटर मुळे संगणकाचा वापर करून त्वरित डोळ्याचा नंबर काढून चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स साठी प्रिस्क्रिप्शन प्रदान करता येणार आहे.
काहीवेळा मोतीबिंदू शस्त्रक्रीया करूनही काही रुग्णांना स्पष्ट दिसत नाही. याचे कारण म्हणजे एक पडदा लेन्स च्या मागे तयार होतो. असा पडदा याग लेझर द्वारे आता नष्ट करून रुग्णाला पुन्हा दृष्टी प्रदान होऊ शकते. असे हे याग लेझर उपकरण आता वालावलकर रुग्णालयाच्या नेत्र विभागात सामील झाले आहे. या माध्यमातून अतिशय जलद, सुरक्षित, बाह्यरुग्ण विभागातच ही शस्त्रक्रिया आता याग लेझर द्वारे करता येणार आहे.
अनेक प्रकारच्या दृष्टी समस्यांवर उपचार करण्यासाठी याग लेझर चा वापर केला जाऊ शकतो. फाटलेल्या रक्तवाहिन्या सील करणे, डोळ्यातील दाब कमी करणे आणि बुब्बूळा चा काही भाग काढून टाकणे ही उदाहरणे आहेत. डोळयांची शस्त्रक्रिया करण्यासाठी ऑपरेटिंग मायक्रोस्कोप हे उपकरण फार महत्वाचे आहे. सर्जिकल मायक्रोस्कोप, हे एक ऑप्टिकल मायक्रोस्कोप आहे. जे विशेषतः सर्जिकल सेटिंगमध्ये वापरण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
विशेषत: मायक्रोसर्जरी साठी आवश्यक आहे. ऑप्टिकल कोहेरेन्स टोमोग्राफी किंवा ओसीटी, ही एक इमेजिंग पद्धत आहे. जी तुमच्या डोळ्याच्या मागील बाजूचे चित्र निर्माण करण्यासाठी वापरली जाते. ज्याला तुमचा डोळयातील पडदा म्हणतात. नॉनइन्वेंजिव्ह पद्धत तुमच्या डोळयातील पडदा आणि ऑप्टिक नर्व्हमधून परावर्तित होणाऱ्या मंद लाल प्रकाशाचे प्रमाण मोजून प्रतिमा तयार करते. अश्या सर्व अद्यावत उपकरणांनी सज्ज अश्या नेत्र विभागाचे उदघाटन संस्थेचे प्रमुख विश्वस्त अशोकराव रघुनाथ जोशी, पुण्यातील नामवंत नेत्र तज्ञ श्रीमती निर्मला सरपोतदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. रघुनंदन कानविंदे, डॉ. आनंद जोशी यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. प्रिया घाग आणि डॉ.अनिकेत खळदकर यांनी केले तर उपस्थितांना नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सागर पाटील यांनी नवीन विभागाची विस्तृत माहिती दिली.










