ॲड. प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती
संतोष कुळे | चिपळूण : वंचित बहुजन आघाडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली रामपूर गुढेफाटा येथे दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कुणबी समाज उन्नती हक्क परिषद आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती वंचित बहुजन आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास (अण्णा) जाधव यांनी ‘प्रहार’शी बोलताना दिली.उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुणबी समाज मोठ्या प्रमाणात असून त्यांचे प्रश्नही तेवढेच मोठे आहेत. स्थानिक स्तरावर त्यांना उद्भवणारे अनेक प्रश्न आजपर्यंत कुठल्याच लोकप्रतिनिधींनी सोडविण्याचा प्रयत्न केलेला नाही. गेली अनेक वर्षे खितपत पडलेला जमीन कुळाचा प्रश्न, ओबीसी आरक्षण प्रश्न त्याचबरोबर स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराचा प्रश्न, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध योजनांबाबत उदासिनता, शैक्षणिक गैरसोयी, स्थानिक राजकीय नेत्यांकडून मिळणारी अपमानकारक वागणूक, नद्यांमध्ये सोडण्यात येणारे रासायनिक दूषित पाणी, त्यामुळे होणारे विविध आजार अशा अनेक समस्या सर्वच समाजातील बांधवांना त्रासदायक ठरत आहेत. मात्र, याकडे कुणीच लक्ष देताना दिसत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि. १६ मे १९३८ साली खेर्डी हत्तीच्या माळावर खोती प्रकरणाबाबत कुणबी समाजाची प्रथम खोती परिषद घेतली होती. त्यानंतर आजतागायत कोकणवासीयांच्या न्यायहक्कासाठी कुणीच आवाज उठवलेला दिसत नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने कुणबी समाजोन्नती हक्क परिषदेचे आयोजन करून त्यांच्या न्यायहक्कासाठी व त्यांना जागरूक करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बहुजनांसाठी राजकीयदृष्ट्या महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश येण्यासाठी गेली दोन वर्षे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे विकास जाधव यांनी आतापर्यंत अनेक कार्यक्रमातून विविध स्तरावर काम केले आहे. बहुजनांना एकत्र करण्यासाठी त्यांनी लोककलेचा आधार घेत त्यांनी मानसिकता तयार करीत आहेत. आता कुणबी समाजासाठी वाडीवस्तीवर जाऊन या कुणबी उन्नती हक्क परिषदेबाबत लोकांशी संवाद साधत आहेत. आज दै प्रहारशी संवाद साधताना गफार अंतुले, प्रवीण जाधव, सागर जाधव कार्यकर्ते उपस्थित होते.










