राजापूर (प्रतिनिधी) राजापूर तालुक्यातील मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलची उभारणी, महामार्गाबाबत रखडलेल्या तक्रारी व शिळ धरणवासीयांना धरणाचे काम सुरू होऊनही न मिळालेला मोबदला यांसह तालुक्यातील विविध रखडलेल्या विकास कामांबाबत बुधवारी शिवसेना तालुका प्रमुख दिपक नागले यांनी सिंधू रत्न समिती सदस्य व उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत यांचे लक्ष वेधले व याबाबतची निवेदने दिली. यावेळी या प्रमुख मागण्यांसह राजापूर तालुक्यातील प्रलंबीत सर्व विकास कामे मार्गी लावण्याची ग्वाही किरण सामंत यांनी यावेळी दिली.
सिंधू रत्न समिती सदस्य व उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत हे बुधवारी राजापुरात आले होते. राजापुरात शासकिय विश्रामगृहावर त्यांनी यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तर यानंतर सामंत यांनी पत्रकारांशीही संवाद साधला.
मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या राजापूर तालुक्यात आरोग्य विषयक चांगल्या उपचारांची गरज लक्षात घेता या ठिकाणी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलची उभारणी होणे गरजेचे असून त्याला मंजुरी मिळून लवकरात लवकर उभारणी व्हावी, अशी मागणी शिवसेना तालुकाध्यक्ष दिपक नागले यांनी सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सुमारे दिड लाख लोकसंख्या असलेला राजापूर तालुका हा डोंगराळ भाग असून येथील गावे विखुरलेली आहेत. तालुक्यात आरोग्य यंत्रणा अपेक्षे प्रमाणे सक्षम नसल्याने राजापूरवासियांना आरोग्य विषयक सुविधा आणि वैद्यकीय उपचारांसाठी सुमारे नव्वद किलोमीटरवरील रत्नागिरी, कोल्हापूर किंवा चारशे किलोमीटरवरील मुंबईवर अवलंबून रहावे लागते. काहीवेळा त्या ठिकाणी पोहचण्यापूर्वी रूग्णाला दुर्दैवीरीत्या जीवही गमवावा लागतो.
मुबंई-गोवा महामार्गाचा विचार करता कणकवली ते रत्नागिरी या दरम्यान खाजगी असो वा सरकारी कोणतेही दर्जेदार सुविधा असलेले रूग्णालय नाही त्यामुळे या ठिकाणी दर्जेदार आणि सोयी सुविधांनीयुक्त मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारावे अशी गेल्या कित्येक वर्षांपासून राजापूरवासियांची मागणी आहे. त्यादृष्टीने काही वर्षांपूर्वी मुबंई-गोवा महामार्गवरील वाटूळ येथील जागेचे सर्वेक्षणही झाले होते. मात्र त्यानंतर या ठिकाणी मागणी असलेले हॉस्पिटल रद्द झाल्याचे बोलले जात आहे.
राजापूरला आरोग्य विषयक चांगल्या उपचारांची गरज लक्षात घेता याठिकाणी हॉस्पिटलची उभारणी होणे गरजेचे आहे. याचा गांभीर्य आणि प्राधान्याने विचार होऊन मल्टि स्पेशालिस्ट हॉस्पिटलला मंजुरी मिळून त्याची लवकरात लवकर उभारणी व्हावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे श्री.नागले यांनी केली आहे.
तर मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात तळगाव सह अन्य भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न आजही मार्गी लागलेले नसून ते मार्गी लावावेत अशीही मागणी केली. तर शहरानजीकच्या शिळ येथे धरणाचे काम सुरू आहे, मात्र धरणासाठी कोणतीही तक्रार न करता जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप जागेचा मोबदला मिळालेला नसल्याची बाबही किरण सामत यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
यावेळी सामंत यांनी राज्याचे उद्योगमंत्री व पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या मार्फत राजापूरातील या सर्व प्रलंबीत प्रश्नांची सोडवणूक केली जाईल असे सांगितले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र व राज्यातील सत्तेच्या माध्यमातुन राजापूर तालुक्याच्या विकासाला गती देण्याचा आमचा प्रयत्न रहाणार असल्याचे सांगितले. तर ग्रामीण भागातील रखडलेली रस्ता, पाणी व अन्य विकास कामे प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी किरण सामंत यांची भाजपाचे तालुका अध्यक्ष सुरेश गुरव यांनीही भेट घेतली.












