वीज मिटरचे रिडींग न घेताच हजारोंचे बिल

आंबडोस येथील ग्राहकाची तक्रार ; महावितरण विरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार करण्याची भूमिका

मालवण | प्रतिनिधी : वीज मिटर रिडींग न दाखवता चुकीच्या पद्धतीने अतिरिक्त स्वरूपात वीजबिल आकारणी केली जात असल्याची तक्रार आंबडोस टेंबवाडी येथील धनंजय नाईक यांनी केली आहे. महावितरणने याबाबत योग्य ती कार्यवाही करून वीज मिटर नुसार बिल आकारणी करावी. अन्यथा ग्राहक मंचाकडे तक्रार करणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले आहे.

 

 

हजारो रुपये लाईट बिल येत असल्याने विचारणा करण्यासाठी मालवण एमएसईबी कार्यालय येथे गेल्यावर मिटरचे कोणतेही रिडींग उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली. वर्षभर सदर वीज मिटरचे अंदाजे वीज बिल आकारणी करत फसवणूक केली जात आहे. वीज मिटर रिडींग का नाही याबाबत विचारणा केली असता वीज मिटर बंद खोलीत असल्याचे सांगण्यात आले. त्याबाबत बंद खोलीचा एक फोटो दाखवण्यात आला. प्रत्यक्षात वीज मिटर हा कोणत्याही बंद खोलीत नाही. घराच्या बाहेरील भिंतीवर आहे. मात्र बंद दरवाजा असलेला दुसरा फोटो दाखवून एमएसईबी फसवणूक करत असून विनाकारण अतिरिक्त वीज बिल आकारणी होत आहे.

वीज बिल भरणा करण्याबाबत तगादा लावला जात आहे. अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्याबाबत सांगितले जात आहे. तरी या बाबत योग्य तो न्याय मिळावा अन्यथा ग्राहक मंचाकडे या संपुर्ण प्रकाराची तक्रार करणार असल्याचे धनंजय धोंडी नाईक यांनी दिलेल्या तक्रार अर्जात स्पष्ट केले आहे.