आजगांव विद्याविहार हायस्कूलच्या १९८८ च्या एसएससी बॅचचा २४ रोजी स्नेहमेळावा 

प्रशालेच्या त्याच वर्गात मिळणार जुन्या आठवणींना उजाळा 

सावंतवाडी । प्रतिनिधी : मित्र…कुणी त्याला दोस्त म्हणतं, कुणी यार म्हणतं, तर कुणी ‘ए भिडू’ असं म्हणत खांद्यावर हात ठेवतो. आपल्या आनंदात सहभागी होणारा आणि दु:खातही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो तो मित्रच. आताच्या सोशल मीडियाच्या जमान्यात मात्र फ्रेंडरिक्वेस्ट पाठवून स्वत:चं वजन दाखवण्यापुरतीच ही मैत्री मर्यादीत राहिली आहे. मात्र, हीच शाळेतील खोडकर मैत्री जागविण्यासाठी सर्व मित्र पून्हा एकदा एकत्र येणार आहेत. निमित्त आहे ते वर्गमित्रांच्या स्नेह मेळाव्याचे ..

सावंतवाडी तालुक्यातील आजगांव येथील विद्याविहार इंग्लिश स्कूलच्या एस एस सी बॅच १९८८ च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा २४ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे. प्रशालेच्या त्याच वर्गात पुन्हा एकदा सर्व मित्र एकत्र येणार असून धमाल मजा मस्ती करणार आहेत.

हा स्नेहमेळावा २४ रोजी सकाळी ८.३० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे. सकाळी शाळेतील प्रार्थना, हजेरी, ओळख तसेच थोडक्यात परिचय केला जाणार आहे. तसेच जुन्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे. त्यानंतर शाळेतील तत्कालीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

त्यानंतर दुसऱ्या सत्रात नृत्य, गायन तसेच विविध गुणदर्शन पर कार्यक्रम संपन्न होणार आहे. तसेच शाळेतील मराठी व इतर विषयांवर वर्ग घेतले जाणार आहेत. त्यानंतर सायंकाळी राष्ट्रगीताने या स्नेह मेळाव्याची व स्नेह संमेलनाची सांगता होणार आहे.