…अन्यथा आंदोलन; शशिकांत चव्हाण; खेड भूमी अभिलेख कार्यालयाबाबत नाराजी
खेड (प्रतिनिधी) येथील तालुका भूमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांनी मोजणीसह इतर अनुषंगिक कामकाजासाठी दिलेली अनेक प्रकरणे गहाळ असून महिना महिना कार्यालयांत फेन्या मारूनसुद्धा शेतकऱ्यांची मोजणीची कामे होत नाहीत. हा प्रकार गंभीर असून नागरिकांना मिळणाऱ्या सेवेत सुधारणा व्हावी तसेच गेले कित्येक महिने गैरहजर असणाऱ्या श्री. भाटकर या कर्मचाऱ्यावर शासकीय दस्तावेज गहाळ केल्याचा आरोप असून त्याच्यावरती तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या उपअधीक्षकांना दिलेल्या निवेदनात कार्यालयातून जनतेची विविध कामे होत नाहीत, कामकाजात अनियमितता आढळून येत आहे. तालुक्यातील सर्व सामान्य शेतकऱ्यांना किरकोळ कामांसाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. शेतकऱ्यांच्या मोजणी प्रकरणांचे शासकीय दस्तावेज मंदार भाटकर या कर्मचाऱ्याने गहाळ करून स्वतः गेल्या काही महिन्यांपासून गैरहजर आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा वरिष्ठ पातळीवरून कुठल्याही प्रकारची कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. याबाबत तत्काळ कारवाई नाही झाली तर आम्हाला उग्र आंदोलन नाईजास्तव छेडावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. जनतेची कामे नियमित व कायदेशीर मार्गाने व्हावीत तसेच या कार्यालयात येणाऱ्या पक्षकारांशी उद्धटपणा न करता सौजन्याची वागणूक द्यावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे









