‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ मालिकेला अचानक ‘पूर्णविराम’

सावंतवाडी । प्रतिनिधी : सन मराठी या चॅनलवर सुरु असलेली ‘ क्षेत्रपाल श्री देव वेतोबा ‘ ही लोकप्रिय ठरलेली मालिका अचानकपणे थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मालिकेचा टी आर पी कमी झाल्याने चॅनलने हा निर्णय घेतला असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. बुधवारी २७ डिसेंबर रोजी या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे करण्यात येणार आहे.

आरवली येथील श्री देव वेतोबा देवस्थान वर आधारित क्षेत्रपाल श्री देव वेतोबा ही मालिका १७ जुलै रोजी सन मराठी या चॅनलवर मोठ्या धुमधडाक्यात सुरू करण्यात आली होती. मालिकेच्या पहिल्याच भागातील श्री देव वेतोबाच्या एन्ट्री ने रसिकांच्या मनावर गारुड केले होते. त्यानंतर अल्पावधीतच ही मालिका अत्यंत लोकप्रिय झाली होती. केवळ सिंधुदुर्ग व कोकणातच नव्हे तर महाराष्ट्र व देश विदेशात राहणाऱ्या मराठी व अमराठी प्रेक्षकांनीही या मालिकेला चांगला प्रतिसाद दिला होता. सुरुवातीला ही मालिका दोन वर्ष चालेल अशी माहिती देण्यात आली होती मात्र आता मालिकेचे चित्रीकरण थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पर्यंत या मालिकेचे १४७ भाग प्रसारीत झाले असून आणखी काही भागानंतर ही मालिका थांबणार आहे.

सावंतवाडी तालुक्यातील मळगावसह परिसरातील गावांमध्ये या मालिकेचे चित्रीकरण सुरू होते. काही प्रमुख भूमिकांमधील कलाकार वगळता स्थानिक कलाकारांना या मालिकेत मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली होती. तर संपूर्ण चित्रीकरण हे याच भागात होत असल्याने इतर माध्यमातूनही स्थानिकांना काही प्रमाणात रोजगार निर्माण झाला होता. मात्र, आता ही मालिका अचानकपणे थांबवण्याचा निर्णय झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

खोताच्या वाड्यापासून सुरू झालेला मालिकेचा हा प्रवास वेतोबाच्या कथेपर्यंत येऊन संपणार आहे. शिवपार्वतीच्या सेवेत असणारा त्यांचा गण वेताळ पार्वती बरोबरच्या युद्धानंतर तिच्या शापाने पृथ्वीतलावर अग्नी वेताळ म्हणून राहतो. त्याच्या क्षेत्रातील लोकांना त्याचा होणारा त्रास पाहिल्यानंतर पार्वती माता वृद्धेच्या रूपात तिथे जाते तर प्रत्यक्ष शंकर भगवान वृद्ध माणसाच्या रूपात तिथे वास्तव्य करतात व त्यानंतर वेताळ शांत होऊन त्याचा श्री क्षेत्र पाल वेतोबा पर्यंत होणारा प्रवास या मालिकेत दाखविला जाणार आहे.

विशेष म्हणजे या मालिकेत श्री देव वेतोबाची भूमिका साकारणारा कलाकार ‘उमाकांत पाटील’ याने साकारलेला वेतोबा रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करून गेला होता. पिळदार शरीरयष्टी व उत्तम अभिनय यामुळे त्याने साकारलेला विठोबा रसिकांच्या पसंतीस उतरला होता. त्याचबरोबर या मालिकेतील भोळा मामा भूमिका साकारणारे विवेक वाळके यांनी देखील आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर गारुड केले होते.

तसेच राजेश भोसले (बाबी), प्राजक्ता वाडये ( बायो ), मंगल राणे ( शालग्या), सचिन वळंजू ( महेश), विवेक गोरे ( खोत ), विवेक वाळके ( भोळा मामा ),वर्षा सामंत ( नानी ), पूजा मटल ( तिसरी ) छोटू पडते ( दामू अण्णा ), अक्षता कांबळी ( गाव मामी ) नमिता गांवकर ( महेशची आई ), दीपक कदम ( धाकलो सोनार ), मृणालीनी जांभळे ( सुवर्णा ), नित्यानंद जडये ( गुरव ), उदय सुकाळे (वालावलकर दुकानदार ), स्वप्नील आराबेकर (हाडको ), पूजा मयेकर, राज पडते ( पपल्या ), संचित तांबे ( नानू ) यांच्या भूमिका रसिकांच्या पसंतीस उतरल्या होत्या.

यातील मुख्यत्वे करून उमाकांत पाटील यांचा वेतोबा, विवेक वाळके यांचा ‘भोळा मामा ‘ तसेच छोटू पडते यांनी साकारलेला ‘दामू अण्णा ‘ व सावंतवाडीतील स्वप्निल आराबेकर याने साकारलेला ‘हाडक्या ‘ यांच्या अभिनयाने रसिकांची विशेष दाद मिळवली होती. यातील अनेक स्थानिक कलाकारांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली होती. तर छोट्या-मोठ्या भूमिकेमधून येणारे स्थानिक कलाकार देखील या मालिकेतून चमकले होते.

मालिकेचे दिग्दर्शक नितीन काटकर यांचं उत्तम दिग्दर्शन, लेखक राजू घाग यांचं लेखन व महाबळेश्वर नार्वेकर यांचे संवाद, महेश कुडाळकर यांचं कला दिग्दर्शन यामूळे या मालिकेला एक वेगळे वलय प्राप्त झाली होते. निर्माता सुनील भोसले, निलेश मयेकर, मंगल राणे, कार्यकारी निर्माता सुश्रुत सांगेलकर यांनीही या मालिकेला एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले होते.

मळगाव येथील पोकळे यांच्या वाड्यासह, सुभाष राऊळ यांचे घर, पोकळे यांच्या वाड्याच्या परिसरात उभारण्यात आलेला मंदिराचा सेट व मळगांव सह वेत्ये, निरवडे व लगतच्या गावांमध्ये करण्यात आलेल्या चित्रीकरण यामुळे या मालिकेने कोकणपण जपतानाच सिंधुदुर्गातील नयनरम्य निसर्गाचा आस्वादही रसिकांपर्यंत पोहोचवला होता. विशेष म्हणजे पूर्णपणे मालवणी भाषेचा पगडा असणारी ही मालिका रसिकांच्या पसंतीस उतरली होती.

मात्र, अलीकडे या मालिकेत दाखविल्या जाणाऱ्या काळी जादू, हाडक्याचे पुनरागमन, जादूटोण्यासारख्या काही गोष्टी यामूळे मालिकेच्या टीआरपी वर काही प्रमाणात परिणाम झाला होता. याच पार्श्वभूमीवर आता चॅनलने या मालिकेचे प्रक्षेपण थांबण्याचा निर्णय घेतला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.