गोव्याकडे जाणाऱ्या गाड्या धावताहेत हाऊसफुल्ल 

नाताळसह नववर्ष स्वागताच्या लगबगीचा परिणाम, नियमित गाड्यांनाही होतेय गर्दी

खेड (प्रतिनिधी)नाताळसह नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची लक्षणीय गर्दी लक्षात घेऊन नियमित गाड्यांव्यतिरिक्त हिवाळी स्पेशलही कोकण मार्गावर धावत आहेत. नववर्ष स्वागताची आतापासूनच लगबग सुरू झाल्याने गोव्याकडे जाणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्या विक्रमी गर्दीन धावत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून एक्सप्रेस गाड्यांना अतिरिक्त डबे जोडले जात आहेत

नूतन वर्ष अवघ्या ५ दिवसांवर येऊन ठेपले असून नवीन वर्ष स्वागताचे नियोजन करत पर्यटकांची पावले आतापासूनच गोव्याच्या दिशेने वळू लागली आहेत.

 

नाताळ सुट्टीसाठी रेल्वे प्रशासनाने कोकण मार्गावर हिवाळी स्पेशल चालवून पर्यटकांच्या मार्गातील अडथळेही दूर केले. नाताळ सुट्टीमुळे नियमित गाड्यांसह सर्वच हिवाळी स्पेशलना गर्दी उसळत आहे. या पाठोपाठच नववर्ष स्वागतासाठी गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याने रेटारेटीचा प्रवास करत गोवा गाठण्याची वेळ पर्यटकांवर येऊन ठेपली आहे.

 

नववर्षामुळे गर्दीचा हंगाम लक्षात घेवून रेल्वे प्रशासनाने हिवाळी स्पेशल गाड्यांची घोषणा करताच सर्वच रेल्वेगाड्यांचे आरक्षण काही मिनिटातच हाऊसफुल्ल झाले.हिवाळी स्पेशल गाड्यांमुळे पर्यटकांच्या मार्गातील विघ्न दूर झाले आहे. दिमतीला वसई मार्गे धावणारी उधना-मंगळूर हिवाळी स्पेशलमुळेही पर्यटकांना दिलासा मिळाला आहे.

 

गोव्याकडे जाणाऱ्या हिवाळी स्पेशलसह सर्वच रेल्वेगाड्यांना गर्दी उसळत आहे. रेल्वे प्रशासनाकडून एकामागोमाग एक जादा हिवाळी स्पेशल सोडण्याचा सपाटाही सुरूच ठेवल्याने पर्यटनासाठी गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांचा परतीचा प्रवासही सुखकर होणार आहे. एक्सप्रेस गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्यात येत असल्याने गर्दीची तीव्रता कमी होण्यास मदत होत आहे. दिमतीला २२ डिसेंबरपासून मडगाव-पनवेल स्पेशलही धावत आहे.