२०४७ ला भारत विकसित राष्ट्र होणार; २०२४ पुन्हा नरेंद्र मोदी होणार पंतप्रधान -माजी आमदार बाळ माने

विकसित भारत यात्रेच्या रथाचे रत्नागिरीत स्वागत

रत्नागिरी : रत्नागिरीत आम्ही या विकसित भारत संकल्प यात्रेचे जल्लोषात स्वागत केले आहे. गेल्या ९ वर्षात मोदी सरकारने केलेल्या कामाची माहिती व योजनांची माहिती, जनजागृती केली जात आहे. तसेच योजनांचे लाभार्थी अनुभवकथन करत आहेत. त्यामुळे आज पुन्हा एकदा मोदी सरकार आले पाहिजे, अशी सर्वांची अपेक्षा आहे. आपल्याला विकसित भारत घडवायचा आहे. स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करून पुढील २५ वर्षे ही अमृतवर्ष असणार आहेत. २०४७ ला भारत जगात विकसित राष्ट्र असेल. १८ ते ४० वयोगटातील तरुण त्याचे आधारस्तंभ आहेत, असे प्रतिपादन रत्नागिरीचे माजी आमदार बाळासाहेब माने यांनी केले.

भारत सरकारची विकसित भारत संकल्प यात्रा आज रत्नागिरीमध्ये दाखल झाली. सकाळी लक्ष्मीचौक येथे झालेल्या यात्रेच्या कार्यक्रमात रहिवासी, लाभार्थ्यांनी भाग घेतला. त्याप्रसंगी बाळासाहेब माने बोलत होते. या वेळी भाजपा द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजपा शहाराध्यक्ष राजन फाळके, माजी नगरसेविका सुप्रिया रसाळ, संपदा तळेकर, मानसी करमरकर, दादा ढेकणे, सौ. ढेकणे, विक्रम जैन आदींसह विविध सरकारी खात्यातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी श्रद्धा शिंदे म्हणाल्या की, मी शहरात भाजी विक्रीचा व्यवसाय करते. पीएम स्वनिधीतून मला दहा हजारांचे कर्ज मिळाले व मी भाजी विक्री सुरू केली. पहिले कर्जे फेडले व पुन्हा २० हजारांचे कर्ज घेतले आहे. केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ मला मिळाला.

संदीप जाधव यांनी सांगितले की, हेड पोस्ट ऑफिसजवळ मी नारळपाणी केंद्र चालवतो. मी पंतप्रधान स्वनिधीतून १० हजारांचे कर्ज घेतले. ते वर्षभरात फेडले व मला पुन्हा २० हजारांचे कर्ज मिळले. मी या योजनमुळे आत्मनिर्भर झालो आहे. मी पंतप्रधा नरेंद्र मोदी यांचा आभारी आहे.

या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लाईव्ह कार्यक्रम दाखवण्यात आला. मोदी यांनी देशभरातील विविध ठिकाणच्या शेतकरी, महिला बचत गटांच्या पदाधिकाऱ्यांची संवाद साधला. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना केंद्र शासन, नगरविकास विभाग व इतर विभागातील विविध योजनांची माहिती देण्यात आली. या योजना लोकांपर्यत पोहोचाव्या आणि योजनेचा प्रसार व प्रचार व्हावा व नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी हा मुख्य उद्देश होता. भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा ही मोहिम आखण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आता पर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, सरकारी योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणीसुद्धा या वेळी करण्यात आली.