चिंदर भगवंतगड किल्ला पायाभूत सुविधा विकासासाठी पर्यटन योजनेतून 25 लाख मंजूर

माजी खासदार निलेश राणे यांचा पाठपुरावा ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून निधी मंजूर : भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची माहिती

मालवण | प्रतिनिधी : जिल्हा वार्षिक पर्यटन योजना अंतर्गत चिंदर भगवंतगड किल्ला येथे पायाभूत सुविधा निर्माण करणेसाठी 25 लाख निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे.

भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचीही भूमिका निधी मंजुरीत महत्वाची राहिली. असे सांगत धोंडी चिंदरकर यांनी सर्वांचे आभार मानले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा झाला. त्यानंतर या जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने पर्यटन विकास होत आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्ह्याची पर्यटन राजधानी असलेल्या मालवण तालुक्यात मोठा विकासनिधी प्राप्त होत आहे. पर्यटन विकासासाठीही अनेक योजनातून पालकमंत्री यांनी निलेश राणे यांच्या मागणीनुसार गेल्या वर्षभरात निधी प्राप्त करून दिला आहे. असेही चिंदरकर म्हणाले.

गुरुवारी निलेश राणे यांनी चिंदर भगवंतगड किल्याची पाहणी केली. येथील सिद्धेश्वर मंदिर येथील पुजारी गोसावी यांनी मंदिर व भगवंतगड किल्ला याबाबत त्यांना माहिती सांगितली. किल्याचे ऐतिहासिक महत्व, किल्ला मार्ग याबाबत सविस्तर माहिती दिली.

अनेक ठिकाणी पडझड झालेल्या या किल्ल्याची दुरुस्ती झाल्यास येथे पायाभूत सुविधा निर्माण झाल्यास पर्यटनाच्या माध्यमातून गावचा विकास एका वेगळ्या उंचीवर जाईल. किल्यावरून आजूबाजूचा दिसणारा संपुर्ण परिसर, कालावल खाडी, हे सर्व चित्र मनमोहक असे आहे. भगवंतगड पर्यटनाचे नवे केंद्र ठरेलं.असे धोंडी चिंदरकर म्हणाले.

दाट झाडी अवघड मार्गातून निलेश राणे यांची पायपीट

निलेश राणे यांनी गुरुवारी सकाळी चिंदर भगवंतगड येथे भेट दिली. आजूबाजूला दाट झाडी, अवघड मार्ग यातून पायपीट करत निलेश राणे व सहकारी भगवंत गडावर पोहचले. सहकाऱ्यांसोबत संपुर्ण किल्याची त्यांनी पाहणी केली.