चिपळूण सती परिसरातील रस्ता पुन्हा करा

भेगा भरण्याच्या कामाला मनसेने केला विरोध

अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा

चिपळूण (प्रतिनिधी) : गुहागर-विजापूर मार्गावर सती परिसरात पडलेल्या भेगा बुधवारी तकलादू पध्दतीने भरण्याचा प्रताप संबधित ठेकेदार करीत होता. मात्र हा प्रकार लक्षात येताच मनसेने हे काम रोखत भेगा न भरता रस्ताच नवीन करण्याची मागणी केली आहे. सिंमेट काँक्रिटच्या या रस्त्याला अल्पावधीतच भेगा पडल्या आहेत. त्यामुळे हा रस्ता पुन्हा करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

बुधवारी तकलादू यंत्रणा आणून या भेगा सिंमेटने भरण्याचा प्रताप ठेकेदार करीत होता. हा प्रकार मनसेचे राजू खेतले, मिलिंद कदम, मंगेश महाडिक, संजय वाजे, आबा हटकर, प्रवीण शेती, सुनील मोडक, गजानन राक्षे, बाळू कुंभार, भाई सुर्वे, राजेंद्र म्हालीम आदींच्या लक्षात येताच त्यांनी कामाच्या ठिकाणी जाऊन हे काम बंद पाडले. त्यानंतर येथे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आले. त्यांना या कार्यकर्त्यांनी आम्हांला भेगा भरणे हे काम मान्य नसून जितक्या किलोमीटरपर्यंत भेगा गेल्या आहेत. तेवढा रस्ता नव्याने करा, अशी मागणी केली. रस्ता पुन्हा केला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे अधिकारी आता कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.