‘होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाला सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती
सौ. सपना भुवड ठरल्या पैठणीच्या मानकरी
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील फणसोप जुवीवाडी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या दत्त मंदिराला यावर्षी 25 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने दत्त जयंतीचे औचित्य साधून देवस्थान कमिटीने विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी विविध स्पर्धा देखील घेण्यात आल्या. 11 डिसेंबर ते शनिवार 16 डिसेंबरपर्यंत भव्य नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले होते. तर 17 डिसेंबर रोजी निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा शालेय गटासाठी घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये सुमारे 350 शाळकरी मुलांनी सहभाग घेतला होता. तसेच महिलांसाठी ‘होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम देखील घेण्यात आला.

मंगळवारी 19 डिसेंबर रोजी श्री गुरुदेव दत्तगुरूंच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला व सायंकाळी ह.भ.प. श्री. विश्वनाथ भाटेबुवा यांच्या सुश्राव्य कीर्तन व रात्री ह. भ. प. श्री. उल्हास लाड बुवा कसोप यांचे भजन आयोजित केले होते. गुरुवार 21 डिसेंबर रोजी सकाळी श्री दत्त महाराजांच्या मूर्तीवर संप्रोक्षण विधी करण्यात आला. त्यानंतर भक्त मंडळींसाठी महाप्रसादाची व्यवस्था देवस्थानच्या वतीने करण्यात आली होती व रात्री ह.भ.प.श्री.नंदकुमार पिलणकर व सुप्रसिद्ध पखवाज वादक श्री विजय पालव यांच्या भजन मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवार 23 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा लहान गट मोठा गट व ग्रुप डान्स अशा तीन गटांमध्ये घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये जवळपास 345 स्पर्धकांनी भाग घेतला होता. लहान गटात प्रथम क्रमांक -श्रुतिका शिंदे, द्वितीय क्रमांक -आरुषी नाईक, तृतीय क्रमांक ऐश्वर्या मनोरकर तर उत्तेजनार्थ पारितोषिक-पर्णी विलणकर यांनी पटकावला. तर मोठ्या गटात प्रथम क्रमांक-ऋत्विक सनगरे, द्वितीय क्रमांक -साजिरी पावसकर, तृतीय क्रमांक-शुभम रसाळ व अभिषेक घवाळी तर उत्तेजनार्थ पारितोषिक-ओम साटम यांनी पटकावला. तर ग्रुप डान्समध्ये प्रथम क्रमांक-स्टुडिओ 23, द्वितीय क्रमांक-अष्टरंग ग्रुप, तृतीय क्रमांक-आकार डान्स अकॅडमी तर उत्तेजनार्थ पारितोषिक-मुकुल माधव विद्यालय सीनियर ग्रुप यांनी पटकावला. या स्पर्धेची सर्व बक्षीसे माननीय नामदार उदय सामंत व त्यांचे जेष्ठ बंधू महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण उर्फ भैय्या शेठ सामंत यांनी प्रायोजित केली होती. या स्पर्धेचे परीक्षण कुमारी गौरी साबळे यांनी केले.
सौ. सपना भुवड ठरल्या पैठणीच्या मानकरी
रविवार 24 डिसेंबर रोजी सायंकाळी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता व त्यानंतर खास महिलांसाठी ‘होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम आयोजित तयार करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांची विशेष उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश साळवी यांनी केले. या स्पर्धेमध्ये 133 महिलांनी सहभाग घेतला. त्यापैकी सौ. सपना भुवड या पैठणीच्या मानकरी ठरल्या व समीक्षा कोळेकर यांना उपविजेतेपदाची सोन्याची नथ मिळाली. याव्यतिरिक्त 18 वहिनींना विविध बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रेक्षकातील महिलांना सुद्धा जवळपास 30 बक्षीसे पटकावता आली .या कार्यक्रमाला सोन्याची नथ ही मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, मारुती मंदिर रत्नागिरी यांनी प्रायोजित केली होती. इतर बक्षिसे नीता नाॅव्हेल्टी मारुती मंदिरचे मालक कांतीलाल प्रजापती व 49&99 मारुती मंदिरच्या मालक गौरी खानविलकर यांनी प्रायोजित केली होती.
सोमवार 25 डिसेंबर रोजी श्री क्षेत्र चिखली दक्षिण काशी कोल्हापूर येथून श्री गुरुदत्तांच्या पादुका फणसोप गावी आणण्यात आल्या. त्यांची भव्य मिरवणूक श्री देव लक्ष्मी केशव मंदिरापासून दत्तमंदिर पर्यंत काढण्यात आली. त्यानंतर पादुकांचे पूजन करण्यात आले व दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. त्याच दिवशी महिलांसाठी पाककला स्पर्धा व रात्री कोकणचा साज संगमेश्वरी बाज या विनोदी कार्यक्रमाचे आयोजन देवस्थानच्या वतीने करण्यात आले होते.
मंगळवार 26 डिसेंबर रोजी म्हणजेच दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी दत्त महाराजांच्या मूर्तीवर व धरणावर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दत्तगुरूंची भिक्षा मागितली गेली. रांगोळी स्पर्धेचे आयोजन ही या दिवशी करण्यात आले होते. तसेच श्री सत्यनारायणाची महापूजा व त्यानंतर श्रीदत्त जन्मोत्सव सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. रात्री शाहीर वृदाली दळवी मुंबई आणि शाहीर वसंत भोईर रायगड यांच्यात शक्ती तुऱ्याचा जंगी सामना आयोजित करण्यात आला होता. बुधवार 27 डिसेंबर रोजी सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन देवस्थानच्या वतीने करण्यात आले होते .
या कार्यक्रमांसाठी ज्या व्यक्तींनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या मदत केली त्या सर्वांचे आभार देवस्थानचे अध्यक्ष श्री तुषार सुरेंद्र साळवी यांनी मानले. हे सर्व कार्यक्रम ज्येष्ठ ग्रामस्थ सतीश दादा साळवी, अनंत गुरुजी साळवी, मनोज साळवी, मनिष साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात आले. तसेच उपाध्यक्ष राकेश उर्फ घारु साळवी, सचिव राजेश अडकेल, खजिनदार निखिल साळवी, सदस्य सुधीर साळवी, अलंकार साळवी, सागर साळवी, राजेंद्र कुंभार, शिवतेज आंबेकर व सन्माननीय ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली. तसेच यापुढेही देवस्थानच्या वतीने असे विविध उपक्रम घेतले जातील अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष श्री तुषार सुरेंद्र साळवी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.











